Arattai | व्हॉट्सअॅपला मेड इन इंडिया पर्याय, Zoho चं 'अराट्टई' अॅप चर्चेत!
Arattai vs WhasApp | प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर व्हॉट्सअॅपसाठी पर्याय शोधत असताना, भारतीय कंपनी झोहो कॉर्पोरेशन मेड इन इंडिया पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. 'अराट्टई' हे अॅप सध्या जोरदार चर्चेत आहे. कसं आहे हे अॅप, जाणून घेऊया.
मुंबई : नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे जगभरातील युजर इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपसाठी पर्याय शोधत असताना भारतीय कंपनी झोहो कॉर्पोरेशन व्हॉट्सअॅपला मेड इन इंडिया पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहे. झोहो कॉर्पोरेशन लवकरच 'अराट्टई' हे मेसेजिंग अॅप युजरसाठी आणणार आहे. त्यामुळे आता या अॅपची जोरदार चर्चा आहे.
चेन्नईस्थित झोहो कॉर्पोरेशन ही कंपनी सॉफ्टवेअर उत्पादन क्षेत्रात नवीन नाही. ऑनलाईन ऑफिस स्वीट, आयटी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तसंच इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. कंपनीचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी रविवारी (10 जानेवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवर अॅपबद्दल काही माहिती सांगितली.
Our Arattai team asked me to not talk about our instant messaging app yet but since it is already being talked about ????, I guess I can talk too.
This is a friends-and-family trial release. We will do a formal launch in a few weeks. We have a lot more in store. Stay tuned! — Sridhar Vembu (@svembu) January 10, 2021
हे अॅप आधीच गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या अॅपला 4.5 स्टार रेटिंग असून आणि 10,000 पेक्षा जास्त युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. अराटई अॅपचं 0.10.44 व्हर्जन सोमवारी अपडेट झालं आहे. कोणत्याही मेसेजिंग अॅपच्या फीचरसारखेच अराट्टईचे फीचर्च आहे. ग्रुप चॅटमध्ये सुमारे 1000 युजर्स आणि व्हिडीओ कॉलमध्ये सहा युजरचा समावेश करता येऊ शकतो.
अराट्टई अॅप कोणती जमा करतं? व्हॉट्सअॅपप्रमाणेच अॅप युजरकडे वैयक्ति माहिती मागू शकतं, जसं की, प्रोफाईलचं नाव, देशाच्या कोडसह फोन नंबर, पत्ता, युसेज डेटा तसंच इतर पर्यायी माहिती म्हणजेच प्रोफाईल फोटो, आपल्या मोबाईलच्या अॅड्रेस बुकमधील कॉन्टॅक्स यासारखी माहिती पुरवण्यास सांगू शकेल.
युसेज डेटामध्ये आपण वापरत असलेल्या मोबाईल डिव्हाईसचा प्रकार, आपला मोबाईल डिव्हाईस आयपी युनिक आयडी, मोबाईल डिव्हाइसचा आयपी अॅड्रेस, मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम, वापरत असलेल्या मोबाईल इंटरनेट ब्राऊझरचा प्रकार आणि इतर डेटा यासारख्या माहितीचा समावेश असू शकतो, असं अराट्टईच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये म्हटलं आहे.
मेसेजेस अराट्टईच्या मेसेजमध्ये सध्या एन्ड टू एन्ट एन्क्रिप्टेड नाही. श्रीधर वेम्बू म्हणाले की, "या फीचरवर सध्या काम सुरु आहे आणि अॅपच्या औपचारिक लॉन्चवेळी ते सादर केले जाईल."
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनचा अर्थ असा की कोणतंही अॅप किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा थर्ड पार्टीला युजरचा अॅक्सेस मिळत नाही किंवा मेसेज वाचता येत नाहीत. व्हॉट्सअॅप मेसेज हे एन्ड-टू-एन्ड एनक्रिप्टेड आहेत.
अराट्टई कोणाला माहिती शेअर करु शकतं? "युजरच्या परवानगीशिवाय आम्ही त्यांची माहिती थर्ड पार्टीसोबत शेअर करत नाही. परंतु अॅपच्या सेवेच्या कामात मदत करण्यासाठी कर्मचारी, बिझनेस पार्टनर, रिसेलिंग पार्टनर आणि थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडरना कदाचित युजरची माहिती शेअर केली जाऊ शकते," असंही अराट्टईने म्हटलं आहे.
"याशिवाय कायद्यांचं पालन करणाऱ्यांसाठी, युजर, कर्मचारी आणि सर्वसामान्यांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी आम्ही सरकारी यंत्रणा, थर्ड पार्टींना माहिती देऊ शकतो," असं अराट्टईच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये म्हटलं आहे.