अकाउंट हॅक प्रकरण, केंद्र सरकारने फेसबुककडून माहिती मागवली
भारतातील एकूण किती अकाउंट हॅक झाली आहेत? केंद्र सरकारचा फेसबुककडे माहिती मागवली आहे.

नवी दिल्ली : फेसबुकचे पाच कोटी अकाउंट गेल्या आठवड्यात हॅक झाले होते. फेसबुकने स्वत: याबाबत माहिती दिली होती. भारतातील युजर्सवर याचा काय परिणाम झाला आहे? याची सविस्तर माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने फेसबुककडे मागवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
फेसबुकचे पाच कोटी अकाउंट हॅक झाले, त्यामध्ये किती भारतीय अकाउंट्सचा समावेश आहे, याची माहिती केंद्र सरकारने फेसबुककडे मागवली आहे. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की, "या घटनेची माहिती आणि योग्य आकडेवारी घेऊन दोन दिवसात उत्तर देऊ."
फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंटला डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका बसल्याची माहिती गेल्या शुक्रवारी म्हणजे 28 सप्टेंबरला समोर आली होती. फेसबुकवर अटॅक करणाऱ्या हॅकरने एक कोड टेकओव्हर करत युझर्सचे अकाऊंट आपल्या ताब्यात घेतलं होतं.
शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास 90 लाखांपेक्षा जास्त अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाले होते. हॅकर्सने फेसबुकच्या View As फीचरच्या कोडवर अटॅक केला आणि प्रोफाईलला टेकओव्हर केलं होतं.
या कोडमुळे हॅकर्सना युझर्सच्या अकाऊटंमध्ये लॉग ईन करण्यासाठी पासवर्डची गरज पडली नाही. फेसबुककडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, पाच कोटी युझर्सच्या सिक्युरिटीवर हा हल्ला झाला होता.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
