(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swati Mohan Profile: नासामध्ये इतिहास रचणार्या स्वाती मोहन कोण आहेत? जाणून घ्या
Swati Mohan Profile: अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने 18 फेब्रुवारीला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मंगळ ग्रहावर 'रोव्हर' यान यशस्वीरित्या उतरवून इतिहास घडविला आहे. या रोव्हरच्या माध्यमातून मंगळावरील जीवनातील शक्यतांचा शोध लावला जाऊ शकतो. नासाच्या या मोहिमेमध्ये भारतीय-अमेरिकन वैज्ञानिक डॉ. स्वाती मोहन यांची मोठी भूमिका आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकन स्पेस एजन्सीने (NASA) आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नासाचे ´रोव्हर´ यान गुरुवारी रात्री भारतीय वेळेनुसार दुपारी 2.25 वाजता मंगळाच्या जेजेरो क्रेटरवर यशस्वीरित्या उतरले आहे. पृथ्वीवरून टेकऑफ केल्यानंतर 7 महिन्यांनंतर हे यान मंगळावर पोहोचले. हे अभियान यशस्वी करण्यामध्ये भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता रोव्हर मंगळावर जीवसृष्टीची चिन्हे तपासणार आहे.
कोण आहे स्वाती मोहन? डॉ. स्वाती मोहन ह्या भारतीय-अमेरिकन वैज्ञानिक आहेत. जन्म झाल्यानंतर एका वर्षाच्या असताना त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. उत्तरी व्हर्जिनिया, वॉशिंग्टन डीसी मेट्रो क्षेत्रात त्यांचे पालन-पोषण झाले. कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल अँड एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये त्यांनी बीएससी आणि एरोनॉटिक्स, अॅस्ट्रोनॉटिक्समध्ये एमआयटी आणि पीएचडी केली आहे. स्वाती सुरुवातीपासूनच नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत मार्स रोव्हर मिशनची सदस्य आहेत.
NASA| नासाची ऐतिहासिक कामगिरी, पर्सेव्हरन्स मार्स रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरले
यासह, त्या नासाच्या विविध महत्त्वपूर्ण अभियानामध्ये सहभागी झाल्या आहेत. स्वाती यांनी कॅसिनी (शनीचे मिशन) आणि ग्रेल (चंद्राकडे उड्डाण करणारे हवाई परिवहन) प्रकल्पांवर काम केले आहे. सन 2013 मध्ये प्रकल्प सुरू झाल्यापासून स्वाती मिशन मंगल 2020 वर कार्यरत आहेत. सध्या त्या नेव्हिगेशन आणि कंट्रोल ऑपरेशन्सचे नेतृत्व करतायेत. सोबतचं नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत मार्स 2020 ला त्या मार्गदर्शन करण्यासह नॅव्हिगेशन आणि नियंत्रण संचालनाचे नेतृत्व करत आहेत.
'स्टार ट्रेक: द नेक्स्ट जनरेशन'ने दिली प्रेरणा स्वाती मोहन यांनी एका मुलाखतीत सांगितले, की "मी लहान असताना 'स्टार ट्रेक: द नेक्स्ट जनरेशन ही टीव्ही मालिका पहायची. या सीरियलने मला खूप प्रभावित केले." ही मालिका पाहिल्यानंतर माझ्या मनात अंतराळ प्रवास आणि अंतराळ शोधासाठी उत्सुकता निर्माण झाली. अंतराळ प्रकल्पांत भारताची कामगिरी अद्वितीय असल्याचेही स्वाती सांगतात. वाहन, उपग्रह, चंद्र आणि मंगळ शोध मोहिमेत भारताची चांगली प्रगती आहे. नासा आणि इस्रो अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकांना पाठिंबा देत आहे. यामध्ये नासा-इस्रो सिंथेटिक अॅपर्चर रडार प्रकल्प समाविष्ट आहे.