Solapur News: शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराच्या पक्षातील नेत्यामुळेच अडचणी वाढणार? मुंबई उच्च न्यायालयाकडून आली नोटीस, नेमकं प्रकरण काय?
Solapur News: उत्तम जानकर हे माळशिरस राखीव मतदार संघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीपक्षाकडून लढले होते आणि विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचा थोडक्या मतांनी पराभव केला होता.

माळशिरस: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांच्या जात प्रमाणपत्राबाबत संकल्प डोळस यांनी केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने जानकर यांना नोटीस बजावली आहे. उत्तम जानकर हे माळशिरस राखीव मतदार संघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचा थोडक्या मतात पराभव केला होता आणि जानकर (Uttamrao Jankar) विजयी झाले होते. यानंतर ईव्हीएममशीनवर संशय घेत जानकर (Uttamrao Jankar) यांनी मारकडवाडी येथून सुरू केलेले आंदोलन देशपातळीला पोहचले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने आमदार जानकर यांना नोटीस दिली
उत्तम जानकर (Uttamrao Jankar) हे माळशिरस राखीव मतदार संघातून हिंदू खाटीक या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. माजी आमदार हणमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस यांनी उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. संकल्प डोळस हे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये काम करीत असले तरी उत्तम जानकर आणि त्यांच्यात संघर्ष आहे. आता 30 जुलै रोजी याची सुनावणी होणार असून याची नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने आमदार जानकर यांना दिली असल्याचे संकल्प डोळस यांनी सांगितले आहे. जातीची खोटी प्रमाणपत्रे घेऊन अनुसूचित जातीच्या जागेवर लढणाऱ्याला मागासवर्गीय समाजाचा विरोध असून या याचिकेत आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास संकल्प डोळस यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
संकल्प डोळस नेमकं काय म्हणालेत?
माळशिरस तालुक्याचे सध्याचे आमदार खोट्या दाखल्यावरती निवडून आले आहेत. त्यांनी सर्वसामान्य मागासवर्गीय समाजामध्ये अतिक्रमण केलं आहे. या अतिक्रमणाच्या विरोधात माजी आमदार हणमंत डोळस यांनी हा लढा मागच्या पंधरा वर्षांपासून सुरू ठेवला होता. त्याच लढ्याला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या लिबर्टीचा वापर करून न्यायालयात पुनर्विचार याचिका मी दाखल केली होती.मागच्या दहा दिवसांअगोदर याबाबतची सुनावणी झाली आणि आमचा मोठा विजय झालेला आहे, उत्तमराव जानकरांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. येणाऱ्या 30 तारखेला सुनावणी आहे, या प्रकरणात शाहनिशा झाली पाहिजे असंही पुढे संकल्प डोळस यांनी म्हटलं आहे.
























