(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Solapur News : दोन वर्षांपासून वीज बिल थकीत, सोलापुरातील समाज कल्याण विभागाचे मुलींचे वसतिगृह धूळखात
Solapur News : वीज बील थकबाकीमुळे मुलींचे सोलापुरातील मोहोळ येथील समाज कल्याण विभागाचे वसतिगृह दोन वर्षांपासून धूळखात पडल्याची परिस्थिती आहे.
Solapur News : वीज बील थकबाकीमुळे मुलींचे सोलापुरातील (Solapur) मोहोळ येथील समाज कल्याण विभागाचे (Social Welfare Department) वसतिगृह दोन वर्षांपासून धूळखात पडल्याची परिस्थिती आहे. तब्बल साडे सहा कोटी रुपये खर्च करुन समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय मुलींसाठी शासकीय वसतिगृहाची (Government Hostel) निर्मिती केली. कोविड काळात जिल्हा प्रशासनाने हे वसतिगृह आरोग्य विभागासाठी ताब्यात घेतले. कोविड काळात या वसतिगृहाचा वापर करण्यात आला. मात्र या काळात वापरलेले जवळपास 1 लाख रुपयांचे वीज बील आरोग्य विभाग किंवा महसूल प्रशासनाने भरलेलं नाही. तसेच वसतीगृहातील खिडक्या, रंगरंगोटी इत्यादीचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे वीज भरल्यानंतर डागडुजी करुनच वसतिगृह हस्तांतरित करावे असे पत्र समाज कल्याण विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. मात्र अद्याप त्यावर कारवाई न झाल्याने ही इमारत धूळखात पडून आहे.
भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी इमारतीसाठी हजारो रुपयांचा भुर्दंड
तर दुसरीकडे मुलींच्या सुविधेसाठी समाज कल्याण विभागाने भाडे तत्त्वावर खासगी इमारत घेतली आहे. त्यासाठी जवळपास प्रत्येक महिन्याला 44 हजार रुपयांचा भुर्दंड देखील सहन करावा लागत आहे. या खासगी इमारतीमध्ये अभ्यासिका, भोजन कक्ष, मनोरंजन कक्ष इत्यादी सुविधा देखील उपलब्ध नाहीत. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे. सोबतच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करत वसतिगृह लवकरात लवकर सुरु करावे, अशी मागणी मोहोळ येथील युवा जागृती मंचचे संस्थपक अॅड. आकाश कापुरे यांनी केली आहे.
लवकरच वसतिगृह आमच्या ताब्यात घेऊ, समाज कल्याण विभागाचं आश्वासन
दरम्यान विज बिल थकल्याने हे वसतीगृह बंद असून जिल्हा प्रशासनाला आम्ही यासंदर्भात पत्र लिहिले आहे. लवकरात लवकर ही कारवाई पूर्ण करुन हे वसतिगृह आम्ही आमच्या ताब्यात घेऊ अशी प्रतिक्रिया समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिली.
हेही वाचा
विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेद्वारे शासनाचे पाठबळ, अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन