एकच शाळा, एकच वर्ग, एकच गाव, सलग 31 वर्ष सेवा, निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना 'धडे' देणारा शिक्षक
भैरवनाथ प्रशाला केवड (Bhairavanath Prashala Kewad) इथं शिक्षक म्हणून काम करणारे रघुनाथ मिरगणे सर 31 वर्षानंतर सेवानिवृत्त झाले आहेत. पण सेवानिवृत्तीनंतरही ते विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार आहेत.
Solapur Madha Retired Teacher News : सरकारी कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना (Teacher) वयाची 58 वर्ष पूर्ण झाली की सेवानिवृत्त व्हावं लागतं. काम करण्याची इच्छा किंवा क्रयकशत्ती असूनही नियमानुसार सेवानिवृत्ती (Retire) घ्यावीच लागते. मात्र, सेवानिवृत्तीनंतरही काही शिक्षक, कर्मचारी काम करताना दिसतात. आज आपण अशीच एक वेगळी बातमी पाहणार आहोत. सगल 31 वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड येथील रघुनाथ दशरथ मिरगणे (Raghunath Dasaratha Mirgane) हे सेवानिवृत्त झाले आहेत. भैरवनाथ प्रशाला केवड (Bhairavanath Prashala Kewad) इथं ते शिक्षक म्हणून काम करत होते. ते सलग 31 वर्ष एकाच शाळेत, एकाच वर्गाचे वर्गशिक्षक आणि एकाच गावात होते. आता सेवानिवृत्तीनंतरही ते विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. जाणून घेऊयात त्यांची यशोगाथा.
सलग 31 वर्ष पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भैरवनाथ प्रशाला केवड इथं रघुनाथ मिरगणे हे शिक्षक म्हणून काम करत होते. ते 31 वर्षाच्या सेनेनंतर आता निवृत्त झाले आहेत. मात्र, निवृत्तीनंतरही ते विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. मिरगणे सर हे भूगोल (Geography) विषयाचे शिक्षक आहेत. ते पाचवी ते दहावी या वर्गाला भूगोल शिकवतात. विशेष म्हणजे ते सलग 31 वर्ष पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक होते. निवृत्त झाल्यानंतर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मी जरी निवृत्त झाला असलो तरी विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचं ज्ञान देण्याचं काम करणार असल्याची माहिती एबीपी माझाला दिली आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना आर्थिक सहाय्य कर
दरम्यान, निवृत्तीनंतर पुढे तुम्ही काय काय करणार याबाबत बोलताना मिरगणे सर म्हणाले की, मी गावात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना आर्थिक सहाय्य करणार आहे. तसेच त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जी काही पुस्तके लागतील ती सर्व पुस्तके पुरवण्याचे काम करणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली. त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्यात मी पुढच्या काळात सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती देखील मिरघणे सरांनी दिली. मात्र, हे करत असताना आपल्या मराठा शाळा टिकल्या पाहिजेत. सुरुवातीच्या काळात गावातील विद्यार्थी गावातच शिकले पाहिजेत यावर माझा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अत्यंत खडतर परिस्थितीत शाळेची उभारणी
मिरगणे सरांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत कठीण परिस्थितीत भैरवनाथ प्रशालेची स्थापना झाली होती. 1991 साली ही शाळा स्थापन झाली होती. त्यानंतर जून 1993 मध्ये मी नोकरीला लागलो. तेव्हापासून मी भूगोल विषय शिकवत असल्याचे मिरगणे सर म्हणाले. सुरुवातीच्या काळात शाळेला स्वत:ची जागा नव्हती. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, गावातील काही शिक्षणप्रेमी नागरिकांनी स्वत:ची घरात देखील वर्ग भरवण्यासाठी जागा दिली. तर काही वर्ग कुडाचे होते, जे वर्ग शेणा मातीच्या सहाय्याने तयार केले होते. अशा अत्यंत खडतर स्थितीत ही शाळा उभी राहिल्याचे मिरगणे सरांनी सांगितले. आज शाळेची टोलेजंग इमारत झाली आहे. कठीण काळातून शाळेची उभी राहिलेली इमारत पाहिल्यानंतर मनाला आंतरिक समाधान वाटत असल्याचेही ते म्हणाले.
कोणी अधिकारी-शिक्षक-पोलीस झालं तर कोणी उत्तम शेतकरी झालं
माझ्या 31 वर्षाच्या काळात अनेक विद्यार्थी घडले. कोणी अधिकारी झालं, कोणी शिक्षक झालं, कोणी पोलीस झाल्याचे मिरगणे सर म्हणाले. तर ज्यांना नोकऱ्या लागल्या नाहीत असे काही विद्यार्थी उत्तम शेतकरी झाले आहेत. तर काहीजण उत्तम व्यवसायिक झाल्याची माहिती देखील मिरगणे सरांनी एबीपी माझाला दिली. या विद्यार्थ्यांबरोबर माझं कुटुंब देखील घडवण्याचं काम मी केलं. माझा भाऊ शिक्षक आहे. मुलगा विक्रीकर निरीक्षक (sales tax inspector) तर मुलगी डॉक्टर असल्याचे मिरगणे सरांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या: