Solapur Fire: पाण्याचे 100 बंब संपले, तरीही आग विझेना, मालकाच्या कुटुंबाला शोधायला भिंत फोडली, अग्निशमन दलाचे जवान भगदाडातून आत शिरले
Solapur Akkalkot Road MIDC Fire News: सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसीतील टॉवेल तयार करणाऱ्या कंपनीत शनिवारी रात्री तीनच्या सुमारास आग लागली होती. ही आग वेगाने पसरली अन् भीषण स्वरुप धारण केले.

Solapur News: सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील टॉवेल तयार करणाऱ्या कारखान्यात शनिवारी मध्यरात्रीनंतर आग लागली होती. कारखान्यातील कच्च्या मालामुळे ही आग वेगाने पसरत गेली आणि तिने भीषण स्वरुप धारण केले होते. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग (Solapur Fire news) अद्यापही पूर्णपणे विझलेली नाही. आतापर्यंत सोलापूर परिसरातील सर्व अग्निशमन दलाचे बंब याठिकाणी बचावकार्यासाठी पोहोचले आहेत. गेल्या आठ तासांमध्ये ही भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून (Fire Birgade) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, पाण्याचे 100 बंब संपल्यानंतरही ही आग अद्याप पूर्णपणे विझलेली नाही. अग्निशमन दलाने शनिवारी रात्री कारखान्यातून जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर या कारखान्याचे मालक उस्मान उस्मानभाई मन्सूरी (वय 78) आणि त्यांचे कुटुंबीय अनस मन्सूरी (वय 24), शिफा मन्सूरी (वय 23), चिमुकला युसूफ मन्सूरी (वय 1) हे चौघेजण अद्याप आत अडकलेले आहेत.
गेल्या काही तासांपासून शर्थीचे प्रयत्न करुनही आग पूर्णपणे विझलेली नाही. त्यामुळे आता उस्मान मन्सूरी यांच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या कारखान्यात मोठ्याप्रमाणावर सामान असल्याने अग्निशमन दलाला आतमध्ये शिरायला जागा मिळत नव्हती. अखेर अग्निशमन दलाने जेसीबीच्या साहाय्याने येथील एक भिंत फोडली आहे.
या फोडलेल्या भिंतीच्या भगदाडातून अग्निशमन दलाचे जवान आतमध्ये शिरले आहेत. फोम आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन अग्निशमन दलाचे जवान आत शिरले आहेत. आगीची तीव्रता कमी झाली असली तरी कारखान्यात सध्या काळ्या धुराचे साम्राज्य आहे. त्यामुळे कारखान्याच्या आतल्या बाजूला हवेत ऑक्सिजनही शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आता उस्मान मन्सूरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वाचवायला निघालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सोबत ऑक्सिजन सिलेंडर घेतला आहे. एमआयडीसीच्या परिसरात सकाळपासून बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. अग्निशमन दलाचे जवान आतमध्ये शिरल्यामुळे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. आतापर्यंत आग विझविण्यासाठी पाण्याचे 100 बंब वापरण्यात आले आहेत. आता कंपनीचे मालक उस्मान मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची जीव वाचणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, तिघांचा मृत्यू, कंपनीचा मालकही आत अडकून पडला
PHOTOS: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू























