Solapur Crime News : पॅरोलवर सुटताचा फरार झाला, लग्नही केलं; अखेर 17 वर्षांनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Solapur Crime News : सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांनी या आरोपीचा मोठ्या प्रमाणात शोध देखील घेतला, मात्र पोलिसांनाही तो सापडत नव्हता.
![Solapur Crime News : पॅरोलवर सुटताचा फरार झाला, लग्नही केलं; अखेर 17 वर्षांनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या Solapur Crime News Accused released on parole absconding for 17 years Arrested by Solapur police Solapur Crime News : पॅरोलवर सुटताचा फरार झाला, लग्नही केलं; अखेर 17 वर्षांनंतर पोलिसांनी ठोकल्या बेड्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/08/e0e6ec693bd5b615aa6957bc687bb9961699426790976737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : गुन्हेगार कितीही हुशार असला तरीही एकना एक दिवस पोलिसांच्या जाळात आडकतोच. असाच काही प्रकार सोलापूरमध्ये समोर आला आहे. पॅरोलच्या रजेवर सुटल्यावर पुन्हा कारागृहात न परतता एक आरोपी फरार झाला होता. सोलापूर पोलिसांकडून त्याचा मागील 17 वर्षांपासून शोध घेतला जात होता. पण तो काही सापडत नव्हता. मात्र, सोलापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर त्याला 17 वर्षांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीला धाराशिव जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. विकास हरी जाधव (रा. शिवाजीनगर, केगाव, ता. उत्तर सोलापूर) असे या कैद्याचे नाव असून, खुनाच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2000 साली झालेल्या हत्येच्या प्रकरणात सोलापूरच्या सत्र न्यायालयाने विकास जाधव यास 31 जानेवारी 2002 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्याला कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले होते. दरम्यान, 4 एप्रिल 2006 रोजी एक महिन्यासाठी विविध अटी आणि शर्ती घालून त्याला पॅरोलवर सुट्टी देण्यात आली. तसेच, पॅरोल संपल्यानंतर 5 मे 2006 रोजी पुढील शिक्षा भोगण्यासाठी त्याला कारागृहात हजर होणे बंधनकारक होते. मात्र, मुदत संपल्यावर देखील विकास जाधव कारागृहात हजर झाला नाही.
अखेर पोलिसांना सापडलाच...
पुढील शिक्षा भोगावी लागू नये म्हणून विकास जाधव हा पॅरोल संपल्यानंतर सुद्धा कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे, 2014 साली विकास जाधव विरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. त्यानंतर सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांनी त्याचा मोठ्या प्रमाणात शोध देखील घेतला. मात्र पोलिसांनाही तो सापडत नव्हता. तर, विकास जाधव हा स्वतःची ओळख लपवून सोलापूर जिल्हा आणि शेजारच्या धाराशिवमध्ये फिरत होता. फरारी असताना त्याने लग्नही देखील केले होते. दरम्यान, विकास जाधव हा सोलापुरातील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील एका लॉजसमोर थांबला असल्याची माहिती सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार दिलीप किर्दक, पोलीस शिपाई भारत पाटील या पथकाने धाव घेत त्याला ताब्यात घेतले. तसेच, त्यास अटक करत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)