Bhima Sugar: भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी 78 टक्के मतदान, कारखान्यावर वर्चस्व कुणाचं हे सोमवारी ठरणार
Bhima Sugar Factory Election: भीमा सहकारी साखर कारखान्यात आपल्याच पॅनेचला विजय होणार असल्याचा दावा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केला आहे.
सोलापूर: अनेक वादामुळे आणि पातळी सोडून झालेल्या आरोपामुळे गाजलेल्या भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आज चुरशीने 78 टक्के एवढे मतदान झाले. मतदानानंतर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास भाजपचे खासदार आणि कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी माझाशी बोलताना व्यक्त केला.
विरोधकांकडे प्रचाराला मुद्दे नसूनही त्यांनी सभासदांवर ही निवडणूक लादल्याचा आरोप करत गुलाल आमचाच असल्याचा दावा महाडिक यांनी केला. आजवर आम्ही सभासदांना दिलेला शब्द पूर्ण केला असून पुढील एका वर्षात दीड लाख लिटर क्षमतेचा आसवानी प्रकल्प उभा करणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले. महाडिकांची पुढची पिढी या निवडणुकीत उतरल्याने कारखान्याचे अध्यक्षपदाबाबत छेडले असता निकालानंतर संचालक ठरवतील तो अध्यक्ष असेल असे त्यांनी सांगितले
राष्ट्रवादीच्या राजन पाटील यांच्या वक्तव्याने गाजलेल्या या निवडणुकीत आज सकाळीपासून मतदानाला सुरुवात झाली. खा महाडिक यांनी आपला उमेदवार असणारा मुलगा विश्वराज आणि कुटुंबासह पुळूज येथे मतदान केले. यानंतर दिवसभर 54 मतदारसंघात सभासदांनी मतदानासाठी गर्दी केली होती. पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ अशा तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या भीमा कारखानयासाठी आज झालेल्या मतदानात 19,430 सभासदांपैकी 15,323 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सोमवारी सोलापूर येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून खासदार धनंजय महाडिक विजयाची हॅट्रिक करणार की राजन पाटील-परिचारक यांचे पॅनल परिवर्तन घडवणार याचा फैसला होणार आहे.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यात खरा सामना होत आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळ्याचं प्रकारचे राजकारण पाहायला मिळालं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी धनंजय महाडिक यांनी पाठिंबा देत, त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. तसेच राजन पाटील यांच्यावर कडाडून टीका केल्याचे देखील पाहायला मिळालं. दुसरीकडं भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी राजना पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर युवा उद्योगपती असणारे साखर कारखानदारीत मोठं नाव असलेले अभिजीत पाटील यांनी धनंजय महाडिकांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळं या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.