राष्ट्रवादीच्या नेत्यावर हल्ला; आठ वर्षानंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजर, विजय राऊतांसह तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी
Solapur News : 1 ऑगस्ट 2014 रोजी राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ज्यात अक्कलकोटे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.

सोलापूर : बार्शी (Barshi) राष्ट्रवादीचे (NCP) तत्कालीन गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावर आठ वर्षांपूर्वी झालेल्या हल्ला प्रकरणात आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू, माजी नगरसेवक विजय राऊत यांच्यासह इतर दोघे हे स्वत:हून बार्शी शहर ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी अटकेची कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने विजय राऊत, दिपक ढावरे, रणजित चांदणे या तिघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
1 ऑगस्ट 2014 रोजी राष्ट्रवादीचे तत्कालीन गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ज्यात अक्कलकोटे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. या प्रकरणात आमदार राजेंद्र राऊत यांचे बंधू, माजी नगरसेवक विजय राऊत यांच्यावर देखील आरोप करण्यात आला होता. मात्र सीआरपीसी 169 प्रमाणे विजय राऊत यांचे नाव या गुन्ह्यातून वगळण्यात आले होते. मात्र फिर्यादी नागेश अक्कलकोटे यांनी या प्रकरणाचा न्यायालयीन पाठपुरावा केल्याने आधी सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने सीआरपीसी 169 ची अपील फेटाळले. त्यामुळे विजय राऊत यांच्यासह आणखी दोघाचा आरोपीच्या यादीत समावेश करण्यात आला.
नागेश अक्कलकोटे यांच्यावर झालेल्या हल्यानंनंतर बार्शी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 84/2014 भा.द.वि. 143, 147, 148, 307, 329, 324, 323, 504, 506, 149 व आर्म ऍक्ट 25 (2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. उच्च न्यायालयाचे निर्णयाने विजय राऊत यांच्यावर देखील गुन्हा दखल झाल्याने त्यांनी बार्शी सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. राऊत त्यांनी उच्च न्यायालयात देखील पूर्व जामीनसाठी धाव घेतली. मात्र ऑगस्ट महिन्यात उच्च न्यायालयाने देखील विजय राऊत यांच्यासह दोघांना दिलासा देण्यास नकार दिला.
त्यामुळे शनिवारी अचानक विजय राऊत हे स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने बार्शी शहरात एकच चर्चा सुरु झाली होती. विजय राऊत हे पोलीस ठाण्यात हजर झाले ही बातमी अवघ्या काही क्षणात शहरभर पसरली. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते यांनी पोलीस ठाणे आणि न्यायालय परिसरात एकच गर्दी केली होती.
कोण आहेत विजय राऊत?
विजय राऊत हे आमदार राजेंद्र राऊत यांचे छोटे बंधू आहेत. ते मागील पंधरा वर्षांपासून नगरसेवक आहेत. शिवाय आर सीसी क्रिकेट क्लब, राजविजय क्रीडा मंडळ आणि मॉर्निंग सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. शिवाय त्याचा खडी क्रशर आणि ठेकेदारीचा व्यवसाय आहे. याप्रकरणी अटक होऊन जामीन झालेले दीपक राऊत हे देखील दहा वर्षांपासून नगरसेवक आहेत.
अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर देखील पोलिसांनी तात्काळ अटक का केली नाही? - नागेश अक्कलकोटे
''विजय राऊत यांना तत्कालीन पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी राजकीय दबावातून गुन्ह्यातून वगळले होते. मात्र न्यायालयीन पाठपुराव्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा आरोपी म्हणून समाविष्ट करावे लागले. मागच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी विजय राऊत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. तरी देखील बार्शी शहरातच फिरत होते. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात देखील आरोपी विजय राऊत हे फिरत होते. मात्र पोलिसांनी त्याही वेळेस त्यांना अटक केले नाही. यावरून पोलिसांवरती राजकीय दबाव आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. तब्बल आठ वर्षानंतर आरोपी स्वतःहून पोलिसात हजर झाले आहेत. यापुढे हे प्रकरण कोर्टात येईल. तेव्हा योग्य न्याय मिळेल." अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील फिर्यादी, राष्ट्रवादीचे नेते नागेश अक्कलकोटे यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
