ज्यांना शिकवून अधिकारी केलं, चांगला पगार देतोय, त्यानेच माझ्यावर घाणेरडे आरोप करुन धमकावले, शिरीष वळसंगकर यांची सुसाईड नोट समोर
Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोटमधील मजकूर एबीपी माझाच्या हाती आलाय.

Shirish Valsangkar : सोलापूरातील सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात वेगळं वळण आलंय. वळसंगकर यांनी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून याप्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या महिलेला अटक करुन न्यायालयात हजर केले असता तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, शिरीष वळसंगकर यांनी सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय? जाणून घेऊयात...
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यू पत्रातील मजकूर
- ज्या माणसाला शिकवून मी आज ए.ओ. (प्रशासकीय अधिकारी) केले आणि चांगला पगार देतो आहे. त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे मला अतीव दुःख आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे.
पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड कॉपीतील मुद्दे
आरोपी महिलेने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून तिच्यामुळे नामांकित डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. मयताने मृत्युपूर्वी चिठ्ठी लिहिली असून, त्यात " महिल्याच्या खोटारड्या आणि घाणेरड्या आरोपामुळे मी माझे जीवन संपवत आहे" असे नमूद केले आहे. आरोपीने मयत डॉ. शिरीष वळसंगकर यांना 17 एप्रिल 2025 रोजी ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्राची छायांकित प्रत जप्त केली असून याशिवाय नमूद महिला आरोपीने कोणते खोटारडे व घाणेरडे आरोप मयतावर केले होते याबाबत तपास करायचा आहे. खोटारडे आणि घाणेरडे आरोपामध्ये आरोपीचा हेतू आणि उद्देश काय होता याचा तपास आम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर आरोपीस या कृत्यामध्ये कोणी मदत केली आहे का कोणी साथीदार आहेत का या सर्व बाबींच्या अनुषंगाने तपास करायचा आहे. आरोपी महिलेच्या हस्ताक्षराचे नमुने आम्हाला घ्यायचे आहेत. आरोपीने मयतास कशा पद्धतीने मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, याचा तपास करणे कामी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळावी.
महिलेचे वकील प्रशांत नवघीरे काय काय म्हणाले?
मनीषा माने या 2008 पासून वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत.सध्या ते एओ म्हणून काम करत आहेत. त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला...17 -4 रोजी त्यांनी डॉक्टर वळसंगकर यांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये पगार कपात होत आहे असा एक मेल पाठवला... "माझ्याबद्दल काही वाईट सांगितले जात आहे... माझ्यावर आरोप होत आहेत... माझी बदनामी होत आहे.. ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करते असा मेल त्यांनी डॉक्टरांना पाठवला...17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलला बोलवून घेतले... तेव्हा महिलेने डॉक्टरांची माफी मागितली.. माफी मागितल्यानंतर डॉक्टरांनी संध्याकाळी घरी जाऊन रिवाल्वर मधून गोळ्या घालून आत्महत्या केली.. अशी एफ आय आर आहे.
चिठ्ठी जप्त झाली आहे... हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासायला पाठवायचे आहे असे मत पोलिसांनी कोर्टासमोर मांडले...प्रख्यात मेंदूरोग तज्ज्ञ असणारे डॉक्टर अशा कारणामुळे आत्महत्या करणे शक्य नाही.. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून.. हे बाहेर येऊ नये यासाठी खोटी केस मनीषा माने यांच्यावर करण्यात आली आहे असा युक्तिवाद आम्ही मांडला आहे...दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.. जेव्हा कोठडी संपेल तेव्हा आम्ही जामिनासाठी अर्ज करू. मनीषा माने यांच्यावर एकही गैरव्यवहाराचा आरोप नाही.
आरोप एवढाच आहे की, त्यांनी डॉक्टरांना मेल केला त्यात त्यांनी डॉक्टरांवर आरोप केले की माझी पगार कपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे...माफी मागून घेतली... कर्मचाऱ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांना बोलवून घेतलं... ती दुष्ट असतील तर तिला बोलून घेण्यात आल नसतं..
एक दिवसाची पगार कपात केली एवढाच विषय आहे..माझ्या क्लाइंटद्वारे मला हीच माहिती मिळाली आहे की मी फक्त मेल केला आहे. बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत..
इतर महत्त्वाच्या बातम्या
























