Shahajibapu Patil: संजय राऊत नाही... हे तर संजय 'आगलावे', त्यांनीच शिवसेना संपवली; शहाजीबापू पाटील यांनी डागली तोफ
Shahajibapu Patil: संजय राऊतांनी शिवसेना संपवल्याबद्दल त्यांना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याकडून मोठं बक्षीस मिळणार असल्याचं आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले.
सोलापूर: हातात टेंभा घेऊन महाराष्ट्र पेटवायचं काम करणाऱ्या संजय राऊत यांचे आज मी आगलावे म्हणून बारसे करतोय, शिवसेना संपवल्याबद्दल शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याकडून त्यांना मोठं बक्षीस मिळणार आहे अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. मी भोसले आहे, माझं नाव बदलायच्या भानगडीत पडू नको असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
शहाजीबापूं पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शहाजीबापू यांचेच नाव बदलायची वेळ आल्याचं सांगितलं. यावर शहाजीबापूं पाटलांनी देखील उत्तर दिलं. ते म्हणाले की, माझ्या पणजीचे नाव जिजाबाई, आजोबांचे नाव संभाजी, बापाचे नाव राजाराम, भावांची नावे शिवाजी, तानाजी, नेताजी आणि मालोजी. माझे आडनाव भोसले आहे, आमचे नाव बदलायच्या भानगडीत राउतांनी पडू नये. आमच्या रक्तात शिवछत्रपतींचा इतिहास भरला असल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, "संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मातोश्री आणि उद्धव साहेबांचे राजकारण संपविण्याचा विडा उचलला आहे. फक्त उद्धव ठाकरे यांची स्तुती करायची, पण त्यांचे सगळे कसे नेस्तनाबूत होईल तेवढेच पाहायचं हेच त्यांनी केलंय. उद्धव ठाकरे यांची सेना संपवायची हा त्यांचा गुप्त डाव असून शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी ती जबाबदारी संजय राऊत यांच्यावर सोपविली होती. आता याचे मोठे बक्षीस शरद पवार आणि सोनिया गांधी त्यांना देतील."
राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने तीन ते चार नेते बघत असनू ती दिवास्वप्ने ठरतील असे सांगत आता सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यांच्यानंतर रोहित पवार यांचेही पोस्टर लागेल असा टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला. मात्र शरद पवार खूप हुशार असून यातील कोणालाच ते मुख्यमंत्री करणार नाहीत. प्रत्येकाला सांगतील हे तुझ्यासाठीच सुरु आहे, पण निवडणूक झाल्यावर आमदार ठरवतील त्या वेळी पाहू असं सांगून गुंडाळून टाकतील असा टोलाही लगावला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यामागचे कुटील कारस्थान दोन काँग्रेसने मिळून केले होते. उद्धव ठाकरे तब्येतीच्या कारणामुळे राज्य सांभाळू शकणार नाहीत आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी सर्व कारभार करायचा, अडीच वर्षे हेच सुरु असल्याने आम्ही सर्व आमदार बंड करून बाजूला झालो.
कोणत्याही पोटनिवडणुकीवर लिटमस टेस्ट होत नसते, पण तरीही आताच्या कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणूक भाजप जिंकेल असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला. ते म्हणाले की, आम्ही कोणात्याही निवडणुकांना घाबरत नसून सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची अडचण दूर झाली की निवडणूक होतील. आम्ही निवडणुकीला घाबरतो असे वातावरण तयार करायचा ते प्रयत्न करीत असले तरी निवडणूक खेळून परिपक्व झालेले इकडे सगळे गडी असून निवडणूक जाता जाता आम्ही खेळू आणि जिंकू.
ही बातमी वाचा: