संजय राऊतांनी सोनिया गांधीं आणि शरद पवारांची चाटूगिरी केली, शहाजीबापूंची टीका
Sanjay Raut : शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलेय.
Shahajibapu Patil On Sanjay Raut : शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. संजय राऊत यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची चाटूगिरी केली, असा निशाणा शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर साधला. शिवसेनेत बंड झाल्यापासून एकदा तरी ठाकरे यांनी राज्याच्या हिताचे एखादे वक्यव्य केले आहे का? असा सवाल शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना केला.
संजय राऊत यांनी ठाकरे परिवाराचे न भरून येणारे नुकसान केले असून ते त्यांना चुकीच्या दिशेला नेत राहिले. एकनाथ शिंदेंवर चाटूगिरीबाबत बोलणाऱ्या संजय राऊत यांनीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांची चाटूगिरी करत अडीच वर्षांपूर्वी सरकार आणल्याचा घणाघात आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचे यांचे दिल्लीत पूर्वीच ठरले होते. त्यानुसारच गेल्या अडीच वर्षाची सत्ता आल्याचा आरोपही शहाजीबापू पाटील यांनी केला.
आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून आजवर उद्धव ठाकरे यांनी कायम शिव्या, चिमटे आणि टोमण्याशिवाय एखादे तरी राज्याच्या हिताचे वक्तव्य केले आहे का? असा सवाल शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे याना केला.
सर्वच शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना आपल्या वडिलांच्या जागी पाहत असतो, तेवढी मोठी विभूती ते होते. मात्र त्यावर देखील टीका करणाऱ्या ठाकरे यांनी एक लक्षात ठेवावे, जनता ही ठाकरे यांच्या वारसांची नाही तर विचारांच्या मागे जाईल असा टोलाही शहाजीबापू यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू भक्कम असल्याने येत्या तीन दिवसांच्या सुनावणीमध्ये विजय आमचाच होणार असा विश्वासही यावेळी शहाजीबापू यांनी व्यक्त केला. आपल्याला मंत्रिपद मिळो अथवा न मिळो त्याचे मला काही वाटत नाही. 20 वर्षे पडत असताना सगळे म्हणत होते की मी पुन्हा आमदार होणार नाही, पण झालो. मंत्रीपदाचेही तसेच आहे. कधी तरी मिळेलच आणि नाही मिळाले तरी आपण आहे यामध्ये समाधानी असल्याचे शहाजीबापू यांनी सांगितले. मात्र काळ्या मातीत पाय रोवणारा शेतकरी मुख्यमंत्री झाला यातच मला आनंद असल्याचे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा :
भाजपला मोठा धक्का! 2024 मध्ये राजकीय परिस्थिती बदलणार? काँग्रेसच्या लोकप्रियतेत मोठी वाढ