(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ranjitsinh Disale : डिसले गुरुजी यांच्यावर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना अटकेत
ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतली आहे. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते.
स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. आज ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतलं आहे.
याच किरण लोहार यांनी डिसले गुरुजींवर काही आरोप केले होते. त्यानंतर डिसले गुरुजींनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती.
शिक्षणाधिकारी किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आहेत. कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त अधिकारी म्हणून लोहार यांच्यावर शिक्का मारण्यात आला. कोल्हापूरमधील लोहार यांची कारकीर्द तर चांगलीच गाजली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केले. शिवाय अनेक गंभीर तक्रारीवरूनच त्यांना जिल्हा परिषदेमधून एकतर्फी कार्यमुक्त केले. मात्र पुढे ते मॅटमध्ये गेले. लोहार यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृह एकदा बंद पडले होते.
किरण लोहार यांच्या वादग्रस्त कामकाजाच्या चौकशीचा अहवाल तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पाठवला होता. चौकशी समितीने लोहार यांच्या कामकाजासंबंधी 43 तक्रारींची चौकशी केली होती. त्यामध्ये कर्तव्यात कसूर करणे, दप्तर दिरंगाई करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे, हेतुपूर्वक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गैरहजर राहणे असे आरोप लोहार यांच्यावर ठेवण्यात आले होते
किरण लोहार यांची वादग्रस्त कारकीर्द
रणजित डिसले गुरुजींवर कारवाई करणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ते जेव्हा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून काम करत होते तेव्हा कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली होती . पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झालं होत . त्यांनतर या संस्थेच्या विरुद्ध शिक्षण संचालकांच्या तक्रारीनंतर पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये 2019 मध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता , त्याचबरोबर टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतंही विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.