Pandharpur News : उजनीसह वीर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग, चंद्रभागा नदी काठावरील झोपडपट्ट्यात शिरलं पाणी
उजनी धरण (Ujani Dam) आणि वीर धरणातून (Veer Dam) मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं पंढरपूरमधील (Pandharpur) चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Pandharpur News : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, उजनी धरण (Ujani Dam) आणि वीर धरणातून (Veer Dam) मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं पंढरपूरमधील (Pandharpur) चंद्रभागा नदीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रभागा किनारी असणाऱ्या व्यास नारायण आणि अंबिका नगरमधील काही घरात नदीचं पाणी शिरलं आहे. प्रशासनाकडून मात्र, कोणतीच सूचना न मिळाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.
संगम जवळ 1 लाख 28 हजार विसर्गाने पाणी भीमा नदीत
सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळं उजणी धरणाच्या पातळीत आणि वीर धरणाच्या पाणी पातळीत देखील मोटी वाढ झाली आहे. या दोन्ही धरणातून सध्या विसर्ग सुरु करण्यात आला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत तर वीर धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून सध्या 50 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर नीरा नरसिंह पूर येथील संगम जवळ 1 लाख 28 हजार विसर्गाने पाणी भीमेत येत आहे. एवढा पाण्याचा विसर्ग सुरु असूनही प्रशासन मात्र सुस्त आहे. त्यामुळं चंद्रभागा नदी काठावरील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. या पाण्यामुळं चंद्रभागा नदी परिसरातील व्यास नारायण आणि अंबिका नगरमधील झोपडपट्टीमध्ये रात्री पाणी घरात आलं आहे. पण प्रशासनानं कोणत्याही प्रकारचा सतर्कतेचा इशारा दिलेला नव्हता. अनेकांची लहान मुलं आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रशासनाने कोणताही माहिती न दिल्यामुळं नागरिकांना प्रशासनाचा निषेध केला. स्थलांतरच्या सुचना देखील दिली नाही. आमदार प्रशांत परिचारक यांच्यावतीन लोकांचे स्थलांतर सुरु आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणताही अधिकारी इकडे फिरकला नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या उजव्या तीरावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे आहे. एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो. पंढरपुरमधील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. यातच विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेचत स्नानाला मोठ्या संख्येन भाविक येत असतात. त्या भाविकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे.