(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahajibapu Patil : एबीपी माझाच्या बातमीनंतर शहाजीबापू थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
सांगोला तालुक्यात परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केली.
Shahajibapu Patil : परतीच्या पावसाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचलं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास या पावसानं हिरावून घेतला आहे. सांगोला तालुक्यात देखील या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. याबाबतची बातमी एबीपी माझाने (Abp Majha) दाखवली होती. त्यानंतर सांगोला तालुक्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी अधिकाऱ्यांसमवेत आज अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला.
सांगोला तालुक्यातील जवळपास 75 गावे अतिवृष्टीमुळं बाधित
सांगोला तालुक्यातील चार सर्कलमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अद्याप शेतात पाणी असून, ओढे नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. सांगोला तालुक्यातीक संगेवाडी परिसरात 990 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 167 टक्के एवढा पाऊस झाला आहे. पाऊस थांबून 12 दिवस उलटले तरी अजून पिकातून पाणी वाहत आहे. सांगोला तालुक्यातील जवळपास 75 गावे अतिवृष्टीमुळं बाधित झाली आहेत. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार शहाजीबापू यांच्यासमोर केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषात बसवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणार असल्याचे यावेळी शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
बच्चू कडू आणि रवी राणा हे आमचे मोठे नेते, लवकरचं त्यांचे वाद मिटतील
आमदार रवी राणा यांच्या 50 खोक्यांच्या प्रश्नावर उत्तर देणं यावेळी शहाजीबापू यांनी टाळलं. आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा हे आमचे मोठे नेते असून, लवकरचं त्यांचे वाद मिटतील असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला. तर सांगोला तालुक्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे, स्वागत करणार का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे सांगोल्यात येणार याचा मला आनंद आहे. पण त्याचं स्वागत त्यांचे कार्यकर्ते करतील, मी शिंदे-फडणवीस यांचे स्वागत करेन असं उत्तर शहाजीबापू पाटील यांनी दिलं.
महत्त्वाच्या बातम्या: