मी रक्त सांडून समाजासाठी लढतोय, तुम्ही नेत्यासाठी लढताय, उगाच नादी लागू नका, नाहीतर...; मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा
Manoj Jarange Solapur Speech : अंतरवाली सराटीत मायमाऊलींच्यावर लाठीचार्ज झाल्यानंतर त्यावेळी बोलला नाहीत, आणि आता नेत्याचा उदोउदो करताय अशी टीका मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांच्यावर केली.
![मी रक्त सांडून समाजासाठी लढतोय, तुम्ही नेत्यासाठी लढताय, उगाच नादी लागू नका, नाहीतर...; मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा manoj jarange reply to bjp mp narayan rane on marathwada maratha reservation statement solapur shantata rally marathi update मी रक्त सांडून समाजासाठी लढतोय, तुम्ही नेत्यासाठी लढताय, उगाच नादी लागू नका, नाहीतर...; मनोज जरांगेंचा नारायण राणेंना इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/07/3990d0adaa63d41997f3ed397e978871172303013882693_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर: मी तुम्हाला दादा म्हणतो, मराठवाड्यात आल्यावर बघून घेतो असं कधीच म्हटलं नाही, पण तुमच्या नेत्यासाठी आमच्यावर टीका करताय असा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केली. मी समाजासाठी रक्त सांडून काम करतोय, तुम्ही तुमच्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी बोलताय हा फरक आहे असंही ते म्हणाले. यापुढे उगाच नादी लागू नका नाहीतर मराठे पिसाळले तर कुणाला सोडणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला.
तुमचा नेता नव्हे तर समाज हा बाप
नारायण राणे यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की, मी कधीच म्हटलो नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका, कधीच म्हटलो नाही की मराठवाड्यात आल्यावर बघून घेऊ. मी माझ्या समाजाचं रक्त सांडून लढतोय. तू काय माझ्या नादी लागू नको, मी तूला दादा म्हणतोय. आम्ही तुमचा सन्मान करतोय, पण पिसाळलो तर अवघड होईल. आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलायचं नाही. ते तुमचे कधी झाले. तुम्ही सगेसोयरे पण नाही, एका रात्रीत नातं कसं जुळलं. तुमची जात मराठा आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरोधात लढायचं असतं. तुमचा पक्ष नव्हे तर समाज हाच बाप असतो.
अंतरवालीत या, माऊलींना घातलेल्या गोळ्या दाखवतो
पक्षासाठी आणि नेत्यासाठी आमच्यावर टीका करणाऱ्यांनी 29 तारखेला अंतरवालीत यावं, ज्या मायमाऊल्यांवर लाठीचार्ज केला होता, ज्यांच्यावर गोळ्या घातल्या त्यांची परिस्थिती दाखवतो असं मनोज जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये आजही दोन तरूण उपचार घेत आहेत. त्यांच्या पोटातली गोळी आजही निघत नाही.
लाठीचार्जवर बोलला नाही
ज्यावेळी महिलांवर लाठीजार्च झाला त्यावेळी जनतेच्या बाजूने बोलला नाही, अत्याचारी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोललात अशी टीका मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांच्यावर केली. ते म्हणाले की, तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे असा तुमचा विचार. मला माझी जात आणि लोकं मोठी झाली पाहिजेत हा फरक आहे. आमच्या जातीला आम्ही बाप मानतो आणि तुम्ही नेत्याला बाप म्हणतात. जातीवंत मराठे यापुढे पक्ष आणि नेत्यापेक्षा जातीला बाप मानेल. खानदानी मराठ्यांची औलाद स्वतःच्या पोरांसाठी उभा राहील.
मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं काम सुरू
सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, नुसता लावालावी करतंय असा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांचे समन्वय फोडण्यासाठी सरकारचे रणनीती सुरू झाली. स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकजण पुढे आले. देवेंद्र फडणवीसांचे ऐकून अभियान सुरू झालं आहे. मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष कालवू नका. मराठ्यांच्या नजरेला नजर मिळवायची आहे, गद्दाराचा शिक्का लाऊ देऊ नका. एका क्रांती मोर्चाचे तीन मोर्चे केले. चांगले समन्वयकांना बदनाम करण्याचं काम सुरू केलंय. तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड नका येऊ.
तुम्हाला काही आमिष दाखवलं असेल, काही पद दिली असतील तर त्यासाठी मराठा समाजाच्या मुलांचं भविष्य नासवू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)