(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोण रोहित पवार? प्रणिती शिंदेंनी फटकारलं; म्हणाल्या, ही त्यांची पहिलीच टर्म, पोरकटपणा असतोच!
Maharashtra Solapur News: सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार की राष्ट्रवादी लढणार याबाबत मविआच्या बैठकीत निर्णय होईल असं रोहित पवार म्हणाले होते, त्यावरुन प्रणिती शिंदे यांनी त्यांना थेट सुनावलं आहे.
Maharashtra Solapur News: सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. कारण आहे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) सुरु असलेल्या चढाओढीचं. काही दिवसांपूर्वी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादीकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. तेव्हापासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये या मतदारसंघावरुन जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना यासंदर्भात विचारल्यानंतर कोण राहित पवार? असा प्रश्न विचारला. तसेच, रोहित पवारांची ही पहिलीच टर्म आहे, काही जणांमध्ये पोरकटपणा असतो, काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं सांगत थेटच सुनावलं आहे. दरम्यान, सोलापूर लोकसभेची जागा (Solapur Lok Sabha Constituency) आघाडीत काँग्रेसकडून लढवली जाते. मात्र याच जागेबाबत आता रोहित पवारांनी भाष्य केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
प्रणिती शिंदे यांचा रोहित पवारांवर घणाघात
सोलापूर लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाकयुद्ध रंगलं आहे. सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार की, राष्ट्रवादी लढणार याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल, असं रोहित पवार म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी रोहित पवार यांच्यावर टीका करत आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ मागू, असं म्हटलं होतं. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शहरातील नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरु होते. त्यावरुन प्रणिती शिंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे. रोहित पवारांची ही पहिलीच टर्म असून काही जणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवसानंतर त्यांच्यात मॅच्युरिटी येईल, असा घणाघात प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
"सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीवरुन व्यक्तिगत राजकारण सुरु आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद झाला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे येथील आमदार आणि खासदार बदलले पाहिजे," असं रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. तसेच, त्याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार शेतकरी मेळाव्याला आले असताना सोलापूरला काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीचा खासदार व्हावा, अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे करु असं सांगितलं होतं.