Tanaji Sawant : आदित्य ठाकरेंना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार, तानाजी सावंतांची टीका, तर शिवसेनेचा पलटवार
आदित्य ठाकरे यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार असे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं.
Tanaji Sawant : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. त्यांना राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार असे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांनी केलं आहे. माझ्या विभागाकडे राज्यातील चार मेंटल हॉस्पिटल आहेत. चार मेंटल हॉस्पिटलपैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार असल्याचे सावंत म्हणाले. तानाजी सावंत यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसैनिक वर्गणी काढून सावंत यांच्यासाठी कृपामाई मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखून ठेवणार असल्याचे हाके म्हणाले.
पन्नास खोके घेऊन सावंत यांचे डोके ठिकाणावर नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना वारंवार आव्हानाची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांची मानसिक स्थिती चांगली नसून त्यांच्यासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड ठेवायची व्यवस्था करू असे तानाजी सावंत म्हणाले होते. आदित्य ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केल्यानंतर आता संतप्त शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. माळशिरस तालुक्यात सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. पन्नास खोके घेऊन सावंत यांचेच डोके ठिकाणावर नसून त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल अशा शब्दात शिवसैनिकांनी आरोग्य मंत्री सावंत यांच्यावर टीका केली आहे.
तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध
तानाजी सावंत हे काल (10 फेब्रुवारी) माढा तालुक्यातील वाकाव या त्यांच्या गावी आले होते. तिथे सावंत परिवाराचे ग्रामदैवत गुंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागला आहे. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतळ्याचे दहन करत आपला रोष व्यक्त केला आहे. युवासेना तालुका प्रमुख वैभव काकडे यांनी सावंत यांच्यावर निशाणा साधताना पन्नास खोके घेऊन सावंत यांचे डोके ठिकाणावर नसल्याने ते अशी बेताल वक्तव्य करू लागले आहेत. त्यांनाच मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायची गरज असल्याची प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भगवान शंकराची उपमा
तानाजी सावंत यांच्यासाठी शिवसैनिक वर्गणी काढून कृपामाई हॉस्पिटलमध्ये एक बेड राखीव ठेवणार आहे. त्याची त्यांना जास्त गरज असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले. सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या या जहरी टीकेमुळे शिवसैनिक संतापले आहेत. आदित्य ठाकरे याना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायचे वक्तव्य करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भगवान शंकराची उपमा दिली होती. यावर उत्तर देताना सावंत यांनी मोदी यांच्या त्याग भावामुळं आपण उपमा दिल्याचे सांगितले. कोरोना काळात देशातील 150 कोटी जनतेसोबत परदेशातील कोरोना रुग्णांनाही मोदी यांनी लस पाठवली होती. यातून त्यांची मानवता दिसते. त्यामुळं आपण त्यांचा उल्लेख केल्याचे सावंत म्हणाले.
शिंदे-फडणवीस युतीचा पहिला प्रयोग 2019 मध्येच केला
राज्यात आघाडी सरकारला घालवण्यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आम्ही भाजप सेनेचा प्रयोग करून सत्ता आणून दाखवली होती. त्यामुळं महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावण्यात आणि शिंदे-फडणवीस युतीचा पहिला प्रयोग 2019 मध्ये आपण करून दाखवल्याचेही तानाजी सावंत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या:
Exclusive: 'मुंढे कर्मचाऱ्यांना धमकवायचे', तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी मंत्री तानाजी सावंतांचं पत्र ABP Majhaच्या हाती