Madha Lok Sabha Election : माढ्यातील मोहिते पाटील-निंबाळकर वाद मिटणार का? चंद्रशेखर बावनकुळे शिष्टाई करण्यासाठी दौऱ्यावर
Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माढाच्या दौऱ्यावर असून यावेळी ते मोहिते पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीचे वेध लागल्यावर आता राज्यातील पक्षांतर्गत वादाचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी भाजप रणनीती आखत असल्याचं दिसून येतंय. त्याचाच एक भाग म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मंगळवारी माढा लोकसभा मतदारसंघाचा (Madha Lok Sabha Election) दौरा करणार आहेत. या मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) आणि मोहिते पाटील यांच्यातील वाद मिटवण्यासाठी ते पुढाकार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील वाद आतातरी मिटेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता बावनकुळे फलटण येथे भाजपचे सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. सायंकाळी पावणेपाच वाजता बावनकुळे माळशिरस मार्गे अकलूज येथील कृष्णप्रिय हॉलमध्ये सुपर वॉरियर्स आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर स्नेहभोजन घेऊन चर्चा करतील.
धैर्यशिल मोहिते पाटलांचा दावा, पण नेते निंबाळकरांच्या पाठिशी
माढा लोकसभा मतदारसंघावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा केल्याने भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मोहिते पाटील यांची माढा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून भाजपाला जिंकता आला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील आमदार बबनदादा शिंदे, करमाळाचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी आपले वजन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्याचे चित्र आहे.
आपल्या पहिल्याच टर्ममध्ये खासदार रणजित निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुक्यातील पाण्याचे, रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्याने मतदारसंघात निंबाळकर यांचा मोठा बोलबाला असल्याची चर्चा आहे.
भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा फायदा राष्ट्रवादीला?
माढ्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्यातील संघर्ष वाढत चालल्याने पक्षाने हा वाद संपविण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडेही माढा लोकसभेसाठी तगडा उमेदवार नसल्याने भाजपमधील संघर्षाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जाऊ शकतो. त्याचमुळे बावनकुळे यांच्यासमोर मोहिते पाटील यांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान समोर आहे. यासाठीच बावनकुळे दुपारचे भोजन फलटण येथे खासदार रणजित निंबाळकर यांचेकडे तर रात्रीचे भोजन मोहिते पाटील यांच्याकडे करणार आहेत .
सध्या खासदार निंबाळकर यांनी जिल्ह्यातील मोहिते पाटील विरोधकांची मोट बांधली असून यात माढा, करमाळा, सांगोला आणि माण खटाव येथील चारही आमदार हे रणजित निंबाळकर यांच्यासोबत आहेत. तर मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमधून 2014 साली मोदी लाटेतही माढा लोकसभा जिंकत आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे माढा लोकसभेचा तिढा कसा सोडवायचा हेच बावनकुळे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. या दौऱ्यात जर मोहिते आणि निंबाळकर यांच्यातील वाद मिटला तर ठीक अन्यथा भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी शरद पवार गट या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे.
ही बातमी वाचा: