(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी महापूजा 'या' उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार? प्रशासनाकडून हालचालींना वेग, आंदोलकांशी चर्चा सुूरू
Pandharpur Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) महापूजेला उपमुख्यमंत्र्यांनी न येऊ देण्यासाठी एका बाजूला आंदोलनाला धार येऊ लागली असताना प्रशासनाने मात्र महापूजेसाठी सर्व प्रकारची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासन त्यासाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रात्री सांगितले. कोळी समाजाचा (Koli Community) प्रश्न सुटेल असे सांगताना आंदोलनाच्या भूमिकेत असणाऱ्या मराठा समाजाच्या (Maratha Samaj) दुसऱ्या गटाशीही चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष मराठा आंदोलकांशी चर्चा झाली नसली तरी पडद्यामागून सर्व गटांशी चर्चा सुरु असल्याचेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. कार्तिकी यात्रेला लाखो भाविक येत असताना त्यांना त्रास होऊ नये याचा विचार आंदोलकांनी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. राज्याला दोन उपमुख्यमंत्री असले तरी यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलकांमधील विविध गट आता एकत्र आले असून त्यांच्यातील मतभेद संपले असल्याची माहिती आहे.
गेले दोन दिवसापासून मराठा आंदोलकांच्या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरमध्ये येताच प्रशासनाची सूत्रे वेगाने हालू लागली. एका बाजूला उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेवरून मराठा आंदोलकांमध्ये दोन गट पडले असताना दुसऱ्या बाजूला आदिवासी कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत पंढरपुरात न येऊ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक हिंमत जाधव आणि पंढरपूरचे डीवायएसपी अर्जुन भोसले हे ऍक्शन मोडवर आले. कोळी समाजाला भेट न मिळाल्याने समाजाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांनी अडवणार आणि हजारो कोळी आंदोलक वारकरी वेशात दाखल झाल्याचा इशारा देऊन गेले. यानंतर हिम्मत जाधव यांनी पुन्हा विश्रामगृहावर या कोळी समाजाच्या शिष्टमंडळाला बोलावून जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा घडवून आणली. चर्चेनंतर कोळी समाजाकडून अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत आंदोलनाबाबत उद्या समाजाच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे.
मराठा समाजातील विविध गट एकत्र
दरम्यान मराठा आंदोलकांच्या रात्री उशिरा संपलेल्या बैठकीत दोन्ही गट एकत्र आले असून मराठा समाजातील दरी संपवली आहे. या बैठकीत खूप सकारात्मक चर्चा झाल्याने मंगळवारी, 21 नोव्हेंबर रोजी प्रशासनासोबत एकत्रित मराठा समाजाच्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे.
गेले दोन दिवस मराठा समाजाच्या दुहीच्या बातम्या आल्यानंतर आज शहराबाहेरील एका मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाची बैठक रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. या बैठकीमध्ये मराठा समाजातील सर्व मतभेद आणि गटबाजी संपवून समाजासाठी सर्व गट एकत्रित आल्याने अतिशय सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती 'एबीपी माझा'ला रात्री उशिरा मिळाली. आता मंगळवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होण्याची शक्यता असून यातून सकारात्मक मार्ग निघू शकणार आहे. या बैठकीत सकल मराठा समाज आपली भूमिका जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडेल आणि चर्चेतून उपमुख्यमंत्र्यांना महापूजा बंदीचा वाद संपणार आहे.