Jaykumar Gore : मंत्रिपदाचं काही खरं नाही, आज पोलिस मागे-पुढे दिसतात, तीन महिन्यांपूर्वी हेच पोलिस मला शोधत होते : जयकुमार गोरे
Solapur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्या कामासाठी सोलापूरचे पालकमंत्रिपद दिलं आहे ते काम पूर्ण करूनच जाणार असं सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटलांना इशारा दिला.

सोलापूर: मंत्रिपदासारखे अनिश्चित काही नसते. आज पोलिस गाड्या आणि पोलिस अधिकारी इथे उभे आहेत. मात्र तीन महिन्यापूर्वी हेच पोलिस माझ्यामागे पळत होते मला शोधायला असं वक्तव्य केलं राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी. मी मंत्री वगैरे काही नाही, मी तुमचा जयाभाऊ आहे. सत्ता कायम कधीच नसते अशा शब्दात आज जयकुमार गोरे यांनी जोरदार टोलीबाजी केली. सांगोला येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांशी संवाद साधताना जोरदार फटकेबाजी केली.
दोन पैजांची वसुली करायला आलोय
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील दोघेही एकाच स्टेजवर होते. आपल्या भाषणात जयकुमार गोरे यांनी दीपक साळुंखे यांची जोरदार फिरकी घेतली. मी इथे वसुलीला आलेलो आहे असे सांगत गेल्या लोकसभेला दीपकआबा आणि आपल्या पाच-पाच लाखाच्या दोन पैजा लागल्या होत्या असं सांगितलं.
एक पैज निंबाळकर निवडून येणार नाहीत म्हणून तर दुसरी पैज सांगोल्यात लीड मिळणार नाही अशी होती. मात्र इतके दिवस उलटूनही या गड्यांनी पैजेचे पैसे मला दिले नाहीत असे सांगत उधारी वसुलीसाठी तुम्हाला इथं बसवले असा टोला लगावला.
नुकत्याच झालेल्या विधानसभेत शहाजीबपू पाटील आणि दीपक साळुंखे हे एकमेकांच्या विरोधात लढल्याने दोघांनाही पराभव पत्करावा लागला होता. इथं दोघेही स्टेजवर आहेत आणि दोघेही घरी बसलेत. तुला नाही, मला नाही आणि घाल कुत्र्याला असं म्हणत शहाजी बापू आणि दीपक साळुंखे या दोघांनाही जयकुमार गोरे यांनी टोला लगावला.
मोहिते पाटलांना इशारा
मला सोलापूरचे पालकमंत्री केल्यामुळे पारा पारावर जोरदार गप्पा चालू आहेत. मात्र ज्यासाठी मला मुख्यमंत्र्यांनी इथे पाठवले ते काम पूर्ण करूनच जाणार असे सांगत पुन्हा एकदा मोहिते पाटील यांचे नाव न घेता इशारा दिला.
माझ्या मान खटाव भागात कधी पाणी येणार नाही असे म्हणणारे नेते आपल्या भागात जन्माला आले हे आपले दुर्दैव असे म्हणत गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता टोला लगावला. त्याच मान खटावमध्ये आज 70 टक्के शेतीला पाणी आहे. जिथे तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता तिथे आज चार साखर कारखाने चालतात असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे घडू शकले असे सांगितले.
पाण्याची एवढी मोठी कामे करूनही रणजीत निंबाळकर यांचा लोकसभेला झालेला पराभव हे माझे दुःख आहे. नुसते उजनी नाही तर तुम्हाला न मिळणारे निरेचे पाणी सुद्धा निंबाळकर यांनी आणून दिले. यापूर्वी ते पाणी कुठे जात होते हे तुम्हालाही माहीत आहे. मात्र निंबाळकर यांनी यासाठी लढा देऊन ते पाणी दुष्काळी सांगोल्याला मिळवून दिले असे सांगत बारामतीकरांनाही टोला लगावला.
ही बातमी वाचा:























