Solapur DPDC : ज्यांनी फक्त आयुष्यभर टक्केवारी गोळा केली त्यांना दुसरं काय दिसणार? जयकुमार गोरे यांची प्रणिती शिंदेंवर टीका
Jaykumar Gore Vs Praniti Shinde : आपण दिलेल्या लेटरपॅडवर जर निधी मंजूर व्हावा असं कुणाला वाटत असेल तर तो बालहट्ट मी पूर्ण करू शकत नाही असा टोला जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला.

सोलापूर : ज्यांनी आयुष्यभर फक्त टक्केवारी गोळा केली त्यांना उठता बसता फक्त टक्केवारीच दिसते, त्यांनी सांगितलेली कामं न झाल्याने बहुतेक त्यांची टक्केवारी बुडाली असेल अशा शब्दात पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचा लोकांशी असलेला संपर्क तुटला आहे असंही गोरे म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीचा निधी (District Planning and Development Council) केवळ टक्केवारी मिळत नाही म्हणून दिला जात नसल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी जयकुमार गोरे यांच्यावर केला होता. त्यानंतर त्याला उत्तर देताना जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर पलटवार केला.
Jaykumar Gore Vs Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा संपर्क तुटला
प्रणिती शिंदे यांचा जनतेशी संपर्क कधीच तुटला आहे. त्यांची खासदारकी सध्या दिल्ली व्हाया बॉम्बे अशी सुरू आहे. ते सातत्याने खाजगी चार्टर्ड प्लेन घेऊन फिरत असतात. त्यामुळे आपल्यासारखे सगळे असतील असे त्यांना वाटत असेल असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला.
Solapur DPDC Fund : यांची टक्केवारी बुडाली असेल
मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, "डीपीडीसीमध्ये जी कामे मंजूर होतात त्याला निधी हा मिळतच असतो. कोणाच्या वैयक्तिक लेटर पॅडवर असा निधी दिला जात नाही. सभेने जी कामे मंजूर केली आहेत त्यांना निधी मिळतच असतो. मात्र माझ्या लेटर पॅडवर मी दिलेलीच कामे मंजूर झाली पाहिजेत हा त्यांचा बालहट्ट मी तरी पूर्ण करू शकत नाही."
आयुष्यभर ज्यांनी टक्केवारी गोळा केली आहे त्यांना उठता बसता फक्त टक्केवारीच दिसते. अशा टक्केवारीवाल्यांवर काय बोलणार? त्यांनी सांगितलेली काम न दिल्याने बहुदा त्यांची टक्केवारी बुडणार असावी, म्हणूनच असे आरोप करीत आहेत असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला.
जयकुमार गोरे काय आहे हे सोलापूर जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. आजवर डीपीडीसीच्या निधी वाटपाला कधी नव्हे एवढी शिस्त लागल्याचं जयकुमार गोरे म्हणाले. सोलापूर जिल्हा नियोजन समितीचा निधी हा कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नसतो, तो सार्वजनिक असतो असंही गोरे म्हणाले.
ही बातमी वाचा:























