निकालापूर्वीच विजयाचे बॅनर, इंदापुरात सुप्रिया सुळे तर फलटमध्ये निंबाळकरांचे अभिनंदनाचे फलक
लोकसभेच्या निकालापूर्वीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे (supriya sule) तर फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकर ( Ranjeetsingh nimbalkar) यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागलेत.
Loksabha Election Result News : लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळीतील अंतिम टप्पा बाकी आहे. तो म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल. आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यानंतर 4 जूनला लोकसभेच्या निकाल लागणार आहे. दरम्यान, लोकसभेच्या निकालापूर्वीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. इंदापूरमध्ये सुप्रिया सुळे (supriya sule) तर फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकर ( Ranjeetsingh nimbalkar) यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागलेत.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
लोकसभा निवडणुकांची मतमोजणी 4 जून रोजी होत आहे. मात्र, उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांचे बॅनर निकलापूर्विच लावण्यास सुरुवात केली आहे. खरंतर यंदा अतिशय चुरशीच्या लढती झाल्याने कोणीचं ठामपणे निकाल सांगू शकत नाही. यातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. इथून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात काट्याची लढत आहे. मात्र, कालपासून इंदापूर परिसरात निकालाच्या तीन दिवस आधीच सुप्रिया सुळें यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. इंदापूर शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत.
फलटणमध्ये निंबाळकर यांच्या अभिनंदनाचे फलक
अशातच चर्चेत राहिलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ. इथे भाजपला सोडचिठ्ठी देत धैर्यशील मोहिते पाटील यांनी हाती तुतारी घेत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना आव्हान दिले होते. याही ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा मोठा परिणाम मतदानावर दिसून आला होता. तरीही माढ्यामधून भाजपचे निंबाळकर जिंकणार की मोहिते पाटील याचा अंदाज लागत नसताना फलटणमध्ये मात्र, निंबाळकर यांच्या अभिनंदनाचे फलक ठिकठिकाणी झळकले आहेत. भाजप युवा मोर्चाचे शंभूराजे भोसले यांनी फलटण शहरात ठिकठिकाणी असे बॅनर लावल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व 48 मतदारसंघ थेट लढती मधील समोरासमोरच्या सर्व उमेदवार सध्या विजयाचे दावे करताना दिसत आहेत. अशात उत्साही कार्यकर्त्यांनी निकलापूर्वीच बॅनर बाजी सुरू केल्याने या नेत्यांची डोकेदुखी देखील वाढू शकते.
बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लढती या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहे. या दोन्ही मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. त्यामुळेच या दोन्ही मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. खरे चित्र 4 जूनला स्पष्ट होणार आहे.