नेमका मुरूम कशासाठी उपसला, कुर्ड गावातून रिॲलिटी चेक; गुन्हा दाखल, ग्रामस्थांनी सांगितली इनसाईड स्टोरी
नेमकं हे प्रकरण काय आहे, मुरुम कशासाठी उपसला जात होता, मुरुम कोण काढत होते, हे पाहण्यासाठी एबीपी माझाने कुर्डू गावात धडक दिली. त्यावेळी, गावाच्या रियालिटी चेकमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी आयपीएस महिला अधिकाऱ्याला फोनवरुन चांगलाच दम भरला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. मुरुम उपसा करणाऱ्यांचं अजित पवार समर्थन करतात, प्रशासकीय कारवाईत अडथळा आणणात, असा सवाल अनेकांनी विचारला. आता, या घटनेची इनसाईड स्टोरी एबीपी माझाने समोर आणली आहे. 31 ऑगस्ट रोजी माढा (Solapur) तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदा मुरूम उपसा प्रकरणावरून करमाळा डीवायएसपी असणाऱ्या आयपीएस (IPS) अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील फोनचे संभाषण व्हायरल झाले. त्यात अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याशी बोलताना ज्या पद्धतीने भाषा वापरली, त्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. तर, याप्रकरणी संबंधित ग्रामस्थांवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुर्डूतील 15 ते 20 ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणि बेकायदा मुरूम उपसाप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
अजित पवारांनी डेरिंग आणि एकेरी भाषेचा उल्लेख केल्याने राज्यभर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. मात्र, नेमकं हे प्रकरण काय आहे, मुरुम कशासाठी उपसला जात होता, मुरुम कोण काढत होते, हे पाहण्यासाठी एबीपी माझाने कुर्डू गावात धडक दिली. त्यावेळी, गावाच्या रिॲलिटी चेकमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या गावातील ग्रामस्थांना रस्त्याच्या अभावी आणि इतरही अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यातूनच ही घटना घडल्याचे समोर आलं. येथील ग्रामस्थांनी पानंद रस्त्यामध्ये गावच्या रस्त्याचे काम सुरू केले होते आणि त्याला हा मुरुम सुरू असल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतने ठराव केला होता, याशिवाय सर्व कागदपत्रेही असतानाही आयपीएस कृष्णा यांच्याकडून कारवाईला सुरुवात करण्यात आल्याने वाद सुरू झाला.
आयपीएस कृष्णा यांना मराठी येत नसल्यामुळे अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन जोडून द्यावा लागला. मात्र, हा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आणि त्यानंतर ग्रामस्थ व अधिकाऱ्यांमध्ये झालेली बाचाबाची याचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वास्तविक कारवाईदरम्यान अंजना कृष्णा या पोलीस गणवेशात नव्हत्या. याशिवाय त्यांच्या सुरक्षारक्षकाने मुरुम घेऊन जाणाऱ्या गाडी ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, हे काम महसूली असताना आयपीएस असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केल्याने वादाला तोंड फुटल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे. या सर्व प्रकारात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. मात्र, मुरुम काढण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर परवानगीबाबत किंवा या सर्व प्रकाराच्या व्हायरल व्हिडिओ बाबत ग्रामस्थांकडे कोणतेच उत्तर नाही. दरम्यान, पोलिसांकडून, महसूल अधिकाऱ्यांकडून ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत ते रद्द करण्याची मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत.
हेही वाचा
फोन करुन अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा
























