पुढच्या 4 महिन्यात आमदार होणार, अभिजित पाटलांनी विधानसभेसाठी फुंकले रणशिंग, वाढदिवसाला मोठं शक्तिप्रदर्शन
पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे.
Abhijit Patil : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सोलापूर (Solapur) जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. पुढच्या 4 महिन्यात मी आमदार होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळं अभिजित पाटील विधानसभेच्या मैदानात उतरणार हे निश्चिम मानले जात आहे.
हजारो कार्यकर्त्यांचा जमाव, 40 जेसीबीमधून पुष्पवृष्टी
अभिजित पाटील यांचा काल (1 ऑगस्ट) वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. हजारो कार्यकर्त्यांचा जमाव, भलामोठा हार आणि 40 जेसीबीमधून सुरु असलेल्या पुष्पवृष्टीत अभिजित पाटील रात्री कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. कार्यकर्त्यांची एवढी गर्दी होती की या मार्गावरील वाहतूक दोन तास जॅम झाली होती. आज अभिजित पाटील काय बोलणार याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष लागले होते. यातच त्यांनी पुढच्या चार महिन्यात आमदार होणार असे सांगताच कार्यकर्त्यांनीही मोठा जल्लोष केला.
पंढरपूर-मंगळवेढा आणि माढा विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते पंढरपुरात
अभिजित पाटील यांच्या वाढदिवसासाठी केक देखील थेट विधानसभा इमारतीचा होता. त्यावर अभिजित पाटील यांचा फोटो लावलेला होता. तर स्टेजच्या मागचे बॅनर देखील विधानसभेचे बनवण्यात आले होते. अभिजित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा आणि माढा या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाल्याने पाटील कोठून लढणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी पहिल्यांदा भाजपवर निशाणा साधत आपले जरा काही चांगले व्हायला लागले की आपल्या मागे लागले असे ते म्हणाले. मात्र, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुठे दोन पावले मागे घ्यायचे आणि कधी हल्ला करायचा हे ठरवल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच राज्य सरकारने आर्थिक अडचणीत असलेल्या अभिजित पाटील यांच्या कारखान्याला 347 कोटीचे कर्ज मंजूर केले आहे. आता पाटील यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकत पुढच्या चार महिन्यात आपण आमदार होणार असल्याचा दावा केला.
भगीरथ भालकेंना टोला
सध्या जे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी इच्छुक आहेत, त्यांना तिकीट मिळणार आहे का? असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडीकडून इच्छुक असणाऱ्या भगीरथ भालके यांच्यावर निशाणा साधला. तर तिकडे माढ्यात आमदार बबनदादा शिंदे हे यावेळी मुलगा रणजितसिंह शिंदे यांना उभे करणार आहेत. तेही अभिजित पाटील इकडे येतो का? म्हणून घाबरु लागल्याचा टोला त्यांनी लगावला.
माढा की पंढरपूर? कोठून निवडणूक लढवणार?
दोन वर्षाची आपली पार्टी पण दोन्ही मतदारसंघातील सर्व पक्ष आपल्याला घाबरु लागल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी विधानसभा पंढरपूरमधून किंवा माढ्यामधून लढवायची याचा निर्णय देखील गनिमी काव्याने योग्यवेळी घेऊ असे पाटील म्हणाले. पण यंदा चार महिन्यांनी आमदार होणार असे त्यांनी सांगितले. दोन्ही मतदारसंघावरील दावा त्यांनी कायम ठेवला आहे. अभिजित पाटील हे तरुण असून त्यांच्यामागे सोलापूर जिल्ह्यात तरुणाईची फार मोठी फौज आहे. अशात आता ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार, त्यावर अनेकांची भवितव्य अवलंबून असणार आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांच्याशीही त्यांचे खूप जवळचे संबंध असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी वाढू शकते.
लोकसभा निवडणुकी दरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर बँकेकडून जप्ती आणली होती. त्यानंतर अभिजित पाटील यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर लगेच कारखान्यावरील जप्ती हटवली होती.
महत्वाच्या बातम्या: