Sindhudurg News: सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाका उद्यापासून सुरू होणार; कृती समितीचा आंदोलनाचा इशारा
Sindhudurg Osargaon Toll : सिंधुदुर्गमधील ओसरगाव टोल नाका उद्यापासून सुरू होणार आहे. स्थानिकांनी टोल वसुलीला विरोध दर्शवला आहे.
Sindhudurg News: तळकोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगावमधील टोल नाका उद्यापासून सुरू होणार आहे. तर, दुसरीकडे टोलविरोधी कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल माफीतून सूट देण्याची मागणी या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा आणि जनतेचा टोल वसुलीला असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन आजपासून काढण्यात आलेला टोलवसुलीचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता. मागील वर्षी जून महिन्यात टोल वसुली करण्यात येणार होती.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली ओसरगाव येथील टोल नाका उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाला खेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही असा इशारा सर्वपक्षीय त्यांनी दिला आहे. त्यामुळे उद्यापासून टोल नाका सुरू होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली ते पत्रादेवी या 60 किमी लांबीच्या मार्गासाठी टोल वसूल केला जाणार आहे. आता, सिंधुदुर्गवासियांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती समिती आक्रमक असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुली करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मंगळवारी ओसरगावमध्ये तणावाची स्थिती असण्याची शक्यता आहे.
ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंत्राट कोरल असोसिएट या राजस्थान मधील कंपनीला देण्यात आले आहे. आतापर्यंत तीन वेळा टोल नाका सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र उद्या सकाळी आठ वाजता टोल सुरू होईल की स्थानिक आक्रमक पवित्रा घेतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ओसरगाव टोल नाक्यावर 14 जूनपासून टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात 50 टक्के सवलत असणार आहे. तर खासगी अव्यावसायिक वाहनांना महिन्यासाठी 330 रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध करण्यात आली.
राजकारण पेटणार?
उद्या, 14 जून रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली ओसरगाव येथे टोल नाका सुरू होत आहे. या अगोदर तीन वेळा टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला सर्व पक्षांचा विरोध होता. उद्या देखील शिवसेना ठाकरे गट विरोधासाठी टोलनाकाच्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीत असून इतर सर्व पक्षांचा टोलला विरोध आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टोलला याआधीच समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे उद्या ठाकरे गट याठिकाणी विरोध करण्यासाठी जाणार आहेत. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली विरोध केला जाणार आहे.
किती असणार टोल दर ?
मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने - 95 रुपये
मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : 155 रुपये
ट्रक आणि बस (2 ॲक्सल) : 320 रुपये
व्यावसायिक वाहने 3 ॲक्सलसाठी : 350 रुपये
मल्टी ॲक्सल 4 ते 6 ॲक्सल वाहनांसाठी : 505 रुपये.
सात किंवा त्याहून जास्त ॲक्सल वाहनांसाठी : 615 रुपये