Sindhudurg : 11 सप्टेंबरला सिंधुदुर्गातील फिश एक्वेरियमचं उद्घाटन, कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न
Sindhudurg Aquarium : येत्या 11 सप्टेंबरला सिंधुदुर्गातील फिश एक्वेरियमचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग : कोकणातील (Kokan) निसर्ग सौंदर्य अनेकांना भूरळ पाडतं. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 11 सप्टेंबरला सिंधुदुर्गातील फिश एक्वेरियमचं (Sindhudurg Aquarium) उद्घाटन करण्यात येणार आहे. निसर्गाचे सौंदर्य कोकणाकडे असल्याने कोकण समृद्ध आहे. याच कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. मंत्री चव्हाण यांनी पुढे सांगितलं की, कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढले पाहिजे, त्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकाला तिकडे सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, महत्त्वाच्या पर्यटन स्थळी पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सोय झाल्या पाहिजेत, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न
सिंधुदुर्गात अनेक पर्यटक सकाळच्या सुमारास जातात पर्यटन करता, पर्यटन स्थळ पाहतात, मात्र, रात्री गोव्याच्या दिशेने जात असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी तिथे राहण्याची व्यवस्था उत्तम प्रतीच्या कशा होतील, त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला तर नक्कीच पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल असं सांगितलं. तर, कोकणातील पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग फिश एक्वेरियम तयार करण्यात आलं आहे. या फिश एक्वेरियममध्ये गोड्या पाण्यातील तसेच खाऱ्या पाण्यातील मासे तसेच विविध प्रजातीचे रंगीबेरंगी मासे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत. येत्या 11 तारखेला हे फिश एक्वेरियम सर्वसामान्यांसाठी खुलं केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई-गोवा महामार्ग गणपतीपर्यंत एक लाईन पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली होती. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे, वाहतूक कोंडी या समस्याला कोकणवासी त्रस्त आहेत. मात्र, कल्याण-डोंबिवलीमध्ये गणपतीच्या आधी शहरातील रस्ते सुस्थितीत असले पाहिजेत, असा निर्देश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना देणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.
गणपतीपूर्वी शहरातील रस्ते सुधारण्याचे निर्देश
कल्याण डोंबिवली शहरात मागील काही दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे..याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शहरातील रस्ते गणपतीपूर्वी सुस्थितीत असले पाहिजेत, असे निर्देश पालिका आयुक्ताना देणार असल्याचे सांगितलं. तर पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, डोंबिवली शहरातील सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
रस्त्यांसाठी 360 कोटी रुपयांचा निधी
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या रस्त्यांसाठी 360 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 130 कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध केला आहे यातून पुढील वर्षभरात शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे होतील आणि नागरिकांची खड्डे रस्त्यातून कायमची सुटका होऊ शकेल असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केला आहे