विजयदुर्गवर हेलियम दिवस उत्साहात साजरा, 154 वर्षांपूर्वी किल्ल्यावरच्या 'साहेबांच्या कट्ट्यावरुन' लागला होता शोध
Helium day : हेलियम वायू ज्या ठिकाणावरून शोधला त्या जागेला साहेबांचा कट्टा म्हणून ओळखले जाते. याच साहेबांच्या कट्ट्यावर आज विजयदुर्गवासीयांनी हेलियम दिवस साजरा केला आहे.
विजयदुर्ग किल्ल्यावर जागतिक हेलियम दिवस विजयदुर्ग ग्रामपंचायतने किल्ल्यावर हेलियम डे साजरा केला असून यावेळी प्रमोद जठार देखील उपस्थित होते. गेली काही वर्ष प्रमोद जठार हेलियम दिवस विजयदुर्ग किल्ल्यावर साजरा करत आहेत. भारतात देखील 154 वर्षांपूर्वी हेलियम वायूचा शोध घेतला गेला. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्यावर जोसेफ नॉर्मन लॅकियर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञाने हेलियम वायूचा शोध घेतला. सूर्यकिरणाचे निरीक्षण करतावेळी हा विजयदुर्ग किल्यावरुन शोध घेण्यात आला. ज्या ठिकाणावरून हा शोध घेतला त्याला साहेबांचा कट्टा असं म्हटलं जातं. भाजपचे नेते प्रमोद जठार यांचं याठिकाणी खगोलशास्त्र प्रयोगशाळा व्हावं अशी इच्छा असून त्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत.
हेलियम हा असा एक घटक आहे, की जो प्रथम पृथ्वीवर न शोधता अवकाशात शोधला गेला. त्याचा अणूक्रमांक 2 आहे. हा रंग, वास व चवविरहित असा वायू आहे. हा बिनविषारी व एकाणू वायू आहे. याचा समावेश 'नोबल गॅस ग्रुप'मध्ये होतो. हायड्रोजननंतर हा दुसरा हलका वायू आहे. हेलियम वायूचा उपयोग स्कुबा डायव्हिंगमध्येही करतात. श्वास घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टाकीत 20 टक्के ऑक्सिजन व 80 टक्के हेलियम वायू असतो. स्कुबा डायव्हर्सना अतिरिक्त वजन घ्यावे लागू नये म्हणून हा उपयुक्त ठरतो.
फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ ज्युलस जेनसिन याने सूर्यग्रहणाच्या वेळी पिवळ्या ज्वाळेच्या रुपात हेलियम शोधला. जोसेफ नॉर्मन लॅकियर या ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञानेही सूर्यावर पिवळी रेषा पाहिली. दोन्ही शास्त्रज्ञांची निरीक्षणे फ्रेंच सायन्स अॅकॅडमीकडे एकाच वेळी पोहोचली म्हणून हेलियमच्या संशोधनाचे श्रेय दोघांकडेही गेलं. मात्र त्या वेळी इतर शास्त्रज्ञांना दोघांच्या निरीक्षणावर व नवीन वायूच्या शोधावर विश्वास नव्हता. ३० वर्षांनंतर स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ विल्यम रामसे याने युरेनियमच्या खाणीत पृथ्वीच्या पोटातील एक नवीन वायू शोधला. शेवटी दोन्ही शास्त्रज्ञांचा फ्रेंच सरकारने सुवर्णपदके देऊन सत्कार केला. अशाप्रकारे हेलियमच्या संशोधनात तिन्ही शास्त्रज्ञांचे नाव घेतले जाते.