Nilesh Rane : निलेश राणेंनी राजकारण का सोडलं? पाच मोठी कारणं
Nilesh Rane : भाजपचे निलेश राणे यांनी एक ट्विट करून आपण राजकारणातून बाजूला होत असल्याचं म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग : राज्याच्या आणि कोकणच्या राजकारणासाठी आज एक मोठी बातमी समोर आली. माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane Tweet) यांनी एक ट्विट करून आपण राजकारणातून कायमचं बाजूला होणार असल्याचं सांगितलं आणि राजकारणात एकच चर्चा सुरू झाली. भाजपचे नेते निलेश राणे राजकारणातून बाजूला होण्याइतपथ काय घडलं? असा सवाल आता विचारला जात आहे.
भाजपमधील एका बड्या नेत्यावर नाराज असल्यानं निलेश राणेंचं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे. निलेश राणे माजी खासदार राहिले आहेत पण सिंधुदुर्ग- रत्नागिरीच्या राजकारणात बाहेरच्या नेत्यांची जास्त ढवळाढवळ असल्यानं गेल्या काही दिवसांपासून त्यांचे खटके उडत असल्याची माहिती आहे. पण निलेश राणेंच्या या निर्णयामुळे राणेंच्या समर्थकांमध्ये मात्र मोठी नाराजी आहे.
निलेश राणे राजकारणातून का निवृत्त होतायत? ही आहेत पाच कारणं
1. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी मतभेद
रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून अंतर्गत खदखद वाढली होती. काही ठिकाणी गळचेपी होत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे अर्थात राणे समर्थक कार्यकर्ते देत होते. त्यातून हा निर्णय निलेश राणे यांनी घेतलेला असावा अशी दाट शक्यता आहे. मुख्य बाब म्हणजे निर्णय घेताना रवींद्र चव्हाण यांच्याकडून विश्वासात घेतले जात नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
2. वैभव नाईकांविरुद्ध कुडाळ मालवणमधून उमेदवारीची शक्यता कमी
निलेश राणे हे यावेळी लोकसभाऐवजी विधानसभा निवडणुकीची तयारी करत होते अशी माहिती आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण (Kudal Malvan Vidhan Sabha Election) या विधानसभा मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी होती. सध्या कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांचा पराभव केला होता. वैभव नाईक हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पण शिवसेनेत पडलेली फुट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर कोकणात जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलला असल्याची माहिती आहे.
3. एकाच घरात तिसरी उमेदवारी मिळणार का?
राणेंच्या घरात सध्या केंद्रीय मंत्रिपद आणि एक आमदारकी आहे. वडील नारायण राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत तर भाऊ नितेश राणे हे आमदार आहेत. त्यामुले निलेश राणे यांना भाजपकडून एकाच घरात तिसरी उमेदवारी दिली जाईल का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते.
4. खासदारकीच्या निवडणुकीत दोन वेळा पराभव
निलेश राणे हे 2009 साली सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतरच्या झालेल्या 2014 आणि 2019 सालच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. निलेश राणे हे कुडाळ मालवणमधून विधानसभेची तयारी करत होते. पण तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.
5. खासदारकीमध्ये इंटरेस्ट नाही, स्वभावही तापट
माजी खासदार निलेश राणे यांचा स्वभाव तापट असल्याची परिसरात चर्चा आहे. त्यांच्या अनेक वक्तव्यावरून राणे कुटुंबीयांवर टीकेची झोड उठली होती. तसेच त्यांना सुरुवातीपासूनच खासदारकीमध्ये काहीच इंटरेस्ट नसल्याचं सांगितलं जातंय.
ही बातमी वाचा: