Pratap Sarnaik: जिथे मनसेने परप्रांतीयांच्या कानाखाली जाळ काढला, तिकडेच शिंदे गटाच्या प्रताप सरनाईकांकडून हिंदी भाषिकांसाठी पायघड्या, आयुक्तांना म्हणाले....
Pratap Sarnaik: मीरा भाईंदरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकप्रकारे 'हिंदीची हाक' देण्यास सुरुवात केली आहे.

Pratap Sarnaik भाईंदर : मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या अभूतपूर्व राड्याच्या घटनेनंतर (MNS Mira Bhayander Morcha) शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी यांच मीरा भाईंदरमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकप्रकारे 'हिंदीची हाक' देण्यास सुरुवात केली आहे. मिरा-भाईंदर शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी रविवारी विशेष शिबिराचे आयोजन केले होते.
आवश्यकता भासली तर मी हिंदीत बोलतो (Pratap Sarnaik on Hindi Language)
या कार्यक्रमात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले कि, मिरा-भाईंदर शहर हे सर्व जातीधर्माचे शहर आहे. त्यामुळे उपस्थितांना समजावे यासाठी हिंदीत बोललात तरी हरकत नाही, असे आपण आयुक्तांना सांगितले. मी स्वतः मराठी आमदार असलो तरी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत असताना हिंदी बोलण्याची आवश्यकता भासली तर मी हिंदीत बोलतो, असे सरनाईक आपल्या भाषणात म्हणाले. मात्र सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर मराठी भाषिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलीय. दरम्यान, या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाधिकारी कृष्ण पांचाळ, मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, कार्यक्रम प्रसंगी मूळचे आसाम राज्यातील असलेले आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी मराठी भाषेत भाषण केले. त्यानंतर मंत्री सरनाईक भाषणासाठी आले. यावेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
मीरा-भाईंदर का तापलं, नेमका वाद काय? (Mira Bhayandar Controversy)
मुंबईसह महाराष्ट्रात मराठीचा (Marathi) मुद्दा तापला असताना मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी 29 जूनच्या रात्री मराठी भाषा न बोलल्याच्या कारणावरून जोधपूर स्वीट्स अँड फरसाणचे मालक बाबूलाल चौधरी यांना मराठी भाषेचा अपमान केल्याच्या आरोपावरून मारहाण केली होती. बाबूलाल यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मीरा-भाईंदरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नेमकं काय घडलं होतं? (Mira Bhayandar Controversy)
जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाने मराठी भाषा बोलण्याची गरज काय, असे वक्तव्य केले होते. त्यावरुन मनसेचे कार्यकर्ते त्याला जाब विचारायला गेले होते. तेव्हादेखील या दुकान मालकाचा मराठी न बोलण्याचा हेका कायम होता. त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकान मालकाच्या कानाखाली जाळ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर मीरा-भाईंदरमधील अमराठी व्यापारांनी मोर्चा काढला होता.
आणखी वाचा
























