Shahapur School : शहापूरच्या संतापजनक प्रकारानंतर शाळा प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह; मान्यता रद्द होण्याचीही शक्यता, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान
ठाण्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या आर एस दमानी या शाळेतील संतापजनक घटनेनंतर शाळेतील प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले जात असून आता या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, या मागणीनेही जोर धरला आहे.

Shahapur School ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या आर एस दमानी या इंग्लिश मीडियमच्या शाळेत मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी तपासल्याचा धक्कादायक प्रकार (Shahapur Damani English School Controversy) समोर आला. त्यानंतर पालक वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आणि शाळेत पालकांनी एकच गोंधळ घातला. या घटनेनंतर पालकांकडून शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी मुख्याध्यापिकासह चार शिक्षक, एक सफाई कामगार आणि ट्रस्टी अशा आठ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी मुख्याध्यापिका, तीन शिक्षिका व एक सफाई कामगार महिला या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर शाळेतील प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित केले जात असून आता या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, या मागणीनेही जोर धरला आहे. असे असताना कदाचित या शाळेची मान्यता रद्द देखील होऊ शकते. कारण या शाळेमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. तर दुसरीकडे आज देखील ही शाळा बंद आहे आणि पुढील काही दिवस देखील ही शाळा बंद राहणार आहे. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचं काय? या काळामध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी या साऱ्याचा परिणाम पुढे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रमावर होणार असून त्यांच्या भवितव्याचं काय? असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे.
शाळेत नेमकं काय घडलं?
शहापूर शहरातील आर एस दमाणी इंग्लिश स्कूलमध्ये 300 च्या जवळपास मुली शिक्षण घेत आहेत. 8 जुलै रोजी सकाळी 10 ते 12 च्या सुमारास मुख्यध्यापिकांनी मुलींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्रित बोलावले. त्यानंतर शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर आणि बाथरुमच्या लादीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्राजेक्टरवर दाखवले. मासिक पाळी आली आहे किंवा नाही याबाबत विचारणा त्यांनी विद्यार्थिनींकडे केली. त्यानंतर ज्या मुलींना मासिक पाळी आली आहे त्या मुलींच्या हाताचे ठसे घेण्यास 5 शिक्षिकाना सांगितले. तसेच ज्या मुली त्यांना मासिक पाळी आली नाही असं सांगतात त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना दिले. या धक्कादायक घटनेची माहिती समजताच पालकांनी ( 9 जुलै रोजी ) शाळा गाठत मुलींसोबत घडलेल्या प्रकराचा जाब विचारत गोंधळ घातला. दुसरीकडे इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक परिणाम होईल अशा रीतीने या विद्यार्थिनींना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रकार केल्याचा आरोप केला.
इतर महत्वाच्या बातम्या























