Sushma Andhare : जयकुमार गोरे कोण तीस मार खान? गोरेंनी आणि चाकणकरांनी आधी स्वतःच चारित्र्य बघावं; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल, SP तुषार दोशींचेही वाभाडे काढले
Satara Doctor Suicide : फलटण महिला डॉक्टर प्रकरणात ज्या सहा जणांची नावे आली आहेत त्यांना पोलीस वाचवत असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी जाणूनबुजून त्या डॉक्टरचे चारित्र्यहनन केल्याचा दावाही त्यांनी केला.

सातारा : फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात (Phaltan Doctor Suicide) ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत व्यवस्थेचे वाभाडे काढल्याचं दिसून आलं. मृत महिलेला न्याय मिळवून देण्यापेक्षा रुपाली चाकणकरांनी आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषींनी तिचं चारित्र्यहनन केलं असा आरोपही अंधारेंनी केला. तसेच जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र्य ठरवणार का? त्या आधी गोरेंनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावं असा टोलाही अंधारेंनी लगावला. या प्रकरणात जी सहा नावे आली आहे त्यांना चौकशीच्या कक्षात घ्यावे अशी मागणीही अंधारेंनी केली.
फलटणमधील मृत महिलेला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. त्यावेळी एसपी तुषार दोशी भेटले नसल्याने अंधारे आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या मांडला. डीवायएसपी खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली. सुषमा अंधारेंनी त्यावेळी अनेक मुद्द्यांवरुन पोलिसांच्या तपास पद्धतीवर टीका केली.
Sushma Andhare PC : तुषार दोशींना काय अधिकार?
सुषमा अंधारेंनी या प्रकरणातील तपासासंबंधी माहिती मागितली असता ती माहिती अशी उघड करता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं. नेमका हाच धागा पकडत अंधारेंनी पोलीस अधीक्षक तुषार दोशींचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या की, "जर ही माहिती जाहीर करता येत नाही असं असेल तर रुपाली चाकणकरांनी त्या महिलेचे चॅट कसं जाहीर केलं? त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या तुषार दोशींनी त्यांना का अडवलं नाही? तुषार दोशी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे ठरवून चारित्र्यहनन केलं का?"
फलटण पोलीस ठाणे छळछावणी झाली आहे. माझा आक्षेप पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांनी जे केलं ते अंतरवाली सराटीतही केले. त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
Sushma Andhare On Jaykumar Gore : जयकुमार गोरेंनी, चाकणकरांनी स्वतःचं चारित्र्य बघावे
सुषमा अंधारे म्हणाल्या की, "या प्रकरणी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनीही त्या महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. तिचे चॅट समोर आणण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे कोण तीस मार खान?जयकुमार गोरेने आधी स्वतःचं चारित्र्य बघावं. चाकणकर बाई चारित्र्य ठरवणार का? त्यांनी आधी स्तःचं तपासावं. तपासातील गोष्ट जर तपास अधिकारी बोलू शकत नाहीत तर मग चाकणकर त्या गोष्टी कशा काय बोलू शकतात?"
Sushma Andhare Phaltan Protest : सहा लोकांची चौकशी करा
या प्रकरणात ज्यांची नावं आली आहेत त्या सहा जणांची चौकशी करा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे दोन पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोपपत्र का दाखल केलं नाही असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला. या लोकांना डिपार्टमेंट वाचवत आहे का असंही सुषमा अंधारे यांनी विचारलं.
मुळात ज्या पोलिसांवर आरोप आहे किंवा संशय आहे त्यांची नावंच आरोपपत्रात नसेल तर मुलीच्या कुटुंबाच्या जबाबाला काहीच अर्थ नाही असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमल्याचे म्हटले जात होते. मात्र ती एसआयटी नसून तेजस्वी सातपुते यांची केवळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचा दावा अंधांरेंनी केला. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसासाठी दिलेला आहे असं त्या म्हणाल्या.
ही बातमी वाचा:
























