Satara News : साताऱ्यात शंभूराज देसाईंच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार; पत्रकारांना उध्दट उत्तरे दिल्याने जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांचा निर्णय
शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पत्रकार परिषदांचा सपाटाच लावला आहे. आपल्याला जे आवश्यक आहे तेवढीच माहिती देणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे.
सातारा : राज्य उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई (Boycott of Shambhuraj Desai press conferences in Satara) यांच्या राज्यभरात होणाऱ्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने घेण्यात आला आहे. पत्रकार परिषदांमध्ये कोणत्याही प्रश्नाची माहिती न घेता पत्रकारांनाच आपला प्रश्न अपुऱ्या माहितीच्या आधारे आहे. असा प्रतिप्रश्न करण्याचा तसेच आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधिल नाही असे उत्तर देण्याचा प्रकार त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे जर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास ते बांधिल नसतील तर पत्रकार परिषदेला जाण्यासही पत्रकार बांधील नाहीत. त्यामुळे राज्यभरात त्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून याला सर्व संघटनांनाचाही पाठिंबा आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, परिषदेचे राज्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या सूचनेनुसार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर,जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघ अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, परिषद प्रतिनिधी सुजित आंबेकर, राज्य महिला सरचिटणीस विद्या म्हासूर्णेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निमंत्रक राहुल तपासे, समन्वयक शंकर मोहिते, डिजिटल मीडिया राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर,तुषार भद्रे, मराठी पत्रकार परिषद सलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषद, 11 तालुक्यांचे पत्रकार संघ यांनी हा निर्णय जाहीर केला.
मंत्री शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पत्रकार परिषदांचा सपाटाच लावला आहे. या पत्रकार परिषदांमध्ये आपल्याला जे आवश्यक आहे तेवढीच माहिती देणे आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून हे योग्य नसल्याचेही त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतरही त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. कोणत्याही पत्रकार परिषदेला वेळेवर न पोहचणे, पत्रकारांना वाट पहात थांबविणे, पत्रकार परिषदेच्या वेळांमध्ये सतत बदल करणे असे त्यांचे प्रकार सुरुच आहेत.
पत्रकारांशी बोलताना देखील आपल्याला माहिती नाही. माहिती घ्या आणि बोला. अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलू नका असा प्रतिप्रश्न कायम केला जातो. मुळात त्यांनाच अनेक प्रश्नांची माहिती नसते. त्यांची माहितीच अपुरी असल्यामुळे त्यांना उत्तर देता येत नाही. पण, त्यासाठी पत्रकारांच्या माहितीबाबत सतत बोलल्यामुळे सर्व पत्रकारांचा कायम अपमान होत आहे. यामुळे आता त्यांच्या कोणत्याही पत्रकार परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला असून त्याला सर्व वृत्तपत्रांच्या संपादकांनीही दुजोरा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या