Satara News : साताऱ्यातील मुनावळ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जागेची पाहणी
Satara News : साताऱ्यातील मनावळ्यात आतंरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार असून त्या जागेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
सातारा: सातारा (Satara) जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असे अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारण्यात येणार आहे. यामुळे 105 गावातील स्थानिकांना रोजगाराच्या उत्तम संधी देखील निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पर्यटन स्थळाची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुर्षोत्तम जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. यावेळी त्यांनी वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हेलिकॉप्टर मधून पाहणी केली. तसेच मुनावळ्यात उभारण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळी स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यांसह अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहे. यामध्ये सुरक्षेचा देखील विचार करण्यात आलाय.
मुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रमस्थांशी संवाद साधताना म्हटलं की, 'स्थानिकांनी सुरू होत असलेल्या या पर्यटन स्थळाचा आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा. हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना देखील यामध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळेल. याचा फायदा पर्यटक आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात होईल.'
मासेमारीला परवनागी द्यावी - मुख्यमंत्री शिंदे
मासेमारीला देखील या पर्यटनस्थळी परवानगी देण्यात यावी. त्यासाठी जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, असा सूचना देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केल्या आहेत.
सातारा हे मुख्यमंत्र्यांचे गाव असल्यामुळे साताऱ्यात आता मोठ्या प्रमाणावर पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणार असल्याची चिन्हं आहेत. त्यातच साताऱ्यात अनेक पर्यटन स्थळं प्रसिद्ध आहेत. त्यामुळे लाखो पर्यटक दरवर्षी या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगार देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे साताऱ्यातील मुनावळ्यात उभारण्यात येणारे हे आतंरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.