(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prithviraj Chavan : छगन भुजबळ काय करतात हे महाराष्ट्राने पाहिलंय; पृथ्वीराज चव्हाणांचा टोला
Prithviraj Chavan On Maratha Reservation : आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय आश्वासनं दिली आहेत त्या माध्यमातून तोडगा काढला पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली.
सातारा : राज्यात आरक्षणावरून निर्माण झालेला संघर्ष हा थांबवला पाहिजे, आरक्षणासारखा प्रश्न हा रस्त्यावर उतरून सुटत नाही असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवारांची घेतलेल्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ काय करतात हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे असा टोला त्यांनी लगावला.
पृ्थ्वीराज चव्हाण म्हणाले की, छगन भुजबळ काय करतात हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. परिस्थिती हाताबाहेर चालली असल्याने काही लोक आताच जागे झाले आहेत. छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट झाली, महाराष्ट्रात जाती-जातीत भेद झाला नाही पाहिजे यासाठीच भेटले असतील तर आनंदाची गोष्ट आहे. मात्र आता महायुतीत बरीच गडबड सुरू आहे, महायुतीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भुजबळ नेमके कशासाठी भेटले याचं कारण दुसरही असू शकतं.
आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष थांबला पाहिजे
आरक्षणावरून संघर्ष निर्माण झाला तो थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे असं सांगत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "आरक्षणासारखे प्रश्न रस्त्यावर उतरून सुटत नाहीत. कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडवला पाहिजे. राज्यात शांतता राखण्याचं काम सरकारचं आहे, त्यासाठी सर्वांचा पाठिंबा राहील. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना जे काही आश्वासन दिलं आहे त्या मार्गातून हा प्रश्न सोडवला पाहिजे."
मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आहे, छगन भुजबळ आणि मुख्यमंत्र्यांची नेमकी काय चर्चा झाली आहे, तसेच शरद पवारांसोबत काय चर्चा झाली आहे हे माहिती नाही, ती माहिती समोर आली तर त्यावर काही तोडगा काढता येईल असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
फुटलेल्या आमदारांवर कारवाई होणार
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 8 आमदार फुटले असून त्यांचा अहवाल हा दिल्लीमध्ये पोहोचला आहे असं सांगत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विधानपरिषदेत जे झाले त्याची काँग्रेस पक्षाकडून चौकशी सुरू आहे. आमच्याकडे पुरेशी मतं नसतानाही मुद्दामहून तीन उमेदवार उभे केले. यावेळी काही मतं फुटणार याची शंका होती. पूर्वीच्या अनुभवावरून ते सुधारतील असंही वाटत होतं. पक्षश्रेष्ठींकडे अहवाल गेला असून त्यामध्ये श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, तो अंतिम असेल. चंद्रकांत हंडोरे ज्यावेळी पराभूत झाले त्याचवेळी कारवाई झाली असती तर विधान परिषदेत ही परिस्थिती उद्भवली नसती.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीबद्दल चांगलं वातावरण आहे. हे सरकार ज्या पद्धतीने बनले तेच लोकांना मान्य नाही. सत्ता मिळवण्याकरता ज्या पद्धतीने माणसं फोडण्यात आली हे जनतेला बिलकुल मान्य नाही. लोकसभेपेक्षा चांगला प्रतिसाद विधानसभेला मिळेल.
ही बातमी वाचा: