Sangli News : मुलांच्या अभ्यासासाठी घरातील टीव्ही, मोबाईल फोन रात्री सात ते साडेआठ बंद, मोहित्यांचे वडगाव गावातला उपक्रम
Sangli News : मुलांचा अभ्यास व्हावा यासाठी घरातील टीव्ही आणि मोबाईल फोन रात्री सात ते साडेआठ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सांगलीतील मोहित्यांचे वडगाव या गावात घेण्यात आला.
Sangli News : मुलांचा रात्रीच्या वेळी घरातील टीव्ही (Television) सुरु असल्यामुळे आणि मोबाईल फोनमुळे (Mobile Phone) अभ्यास होत नाही किंवा मुलंच टीव्ही तसंच मोबाईल फोनच्या नादापायी अभ्यास करत नाहीत ही अडचण प्रत्येकाच्या घरातील. पण यावर उपाय तरी काय काढायचा, मुलांना अभ्यासात कसे गुंतवायचे हा प्रश्न पालकांना पडलेला असतो. सांगली (Sangli) जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव या गावामधील नागरिकांना देखील हा प्रॉब्लेम सतावत होता. मात्र या गावच्या नागरिकांनी यावर उपाय शोधला आणि तोही जालीम. घरातील टीव्ही आणि फोनच रात्री सात ते साडेआठ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे सर्वांकडून पालन व्हावे म्हणून गावातील मंदिरावर भोंगाही बसवण्यात आला आहे.
संध्याकाळी सात वाजल्यापासून घरोघरी सुरु असलेल्या मालिका आणि मुलाच्या हातात घरातील व्यक्तींचे हातात येणारे मोबाईल फोन. घरात सुरु असलेल्या या मालिकेचा आणि मुले वापरत असलेल्या मोबाईल फोनचा थेट परिणाम हा मुलांच्या अभ्यासावर होत आहे. म्हणूनच कडेगाव तालुक्यातील 3 हजार 105 लोकसंख्येचे गाव असलेल्या मोहित्यांचे वडगावमध्ये आमसभेत मालिका आणि मोबाईल फोनचा मुलांच्या अभ्यासावर होणारा गंभीर परिणाम या विषय मांडून त्यावर चर्चा करण्यात आली. त्यात रात्री सात ते साडेआठ हा दीड तासांचा हा कालावधी नागरिकांनी एकमताने निश्चय केला आणि 15 ऑगस्टपासून अंमलबजावणी देखील सुरु झाली.
या उपक्रमाची आठवण लोकांना राहावी या उद्देशाने ग्रामपंचायत जवळील मंदिरावर एक भोंगा लावला. गावामध्ये प्राथमिक शाळेत शिकणारी 130 तर माध्यमिक शाळेत शिकणारी 450 मुले आहेत. आधी मुलांच्या आणि पालकाच्या अंगवळणी हा निर्णय पडला नव्हता. तर यासाठी सात ते साडेआठ या वेळेत मुलं घराबाहेर पडलेली दिसणार नाहीत आणि नागरिकही टीव्ही चालू ठेवणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी गावातील अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपवण्यात आली.
अभ्यासाची गोडी लागली : विद्यार्थिनीची प्रतिक्रिया
शाळा सुटल्यावर आम्ही थोडं खेळतो. त्यानंतर रात्री सात वाजता भोंगा वाजल्यावर आई-वडील घरातले टीव्ही तसंच मोबाईल फोन बंद करतात. या उपक्रमामुळे अभ्यासाची गोडी लागल्याची प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली आहे. "सुरुवातीला आम्ही टीव्ही पाहत अभ्यास करायचो, त्यामुळे आमच्याकडून अनेक चुका व्हायच्या. परंतु आता आम्हाला शिस्त लागली आहे," असं दुसऱ्या विद्यार्थिनीने म्हटलं.
नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे : सुवर्णा जाधव, अंगणवाडी सेविका
"कोरोनाकाळात मुलांना घराबाहेर जाऊ न देता मोबाईल फोन त्यांच्या हाती देण्यात आले. परंतु यामुळे मुले फोनच्या आहारी गेली. त्यामुळे मोहित्यांचे वडगाव या गावातील सरपंचांनी अनोखा उपक्रम राबवला त्याला आम्ही पाठिंबा दिला. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आम्ही जेव्हा तपासणी करण्यासाठी घरी जातो तेव्हा मुलं अभ्यास करत असतात," अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविका सुवर्णा जाधव यांनी व्यक्त केली.