Sangli Crime : जतमधील माजी नगरसेवक विजय ताड खून प्रकरणातील फरारी संशयित आरोपी अखेर स्वत:हून हजर
संशयित आरोपी उमेश सावंत सांगली जिल्हा न्यायालयात आज हजर झाला. गेल्या वर्षभरापासून उमेश सावंत फरार होता. उमेश सावंतची वैद्यकीय तपासणी करुन जिल्हा कारागृहात रवानगी केली जाणार आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यातील जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांची 17 मार्च 2023 रोजी भर दिवसा गोळ्या झाडून आणि डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात फरार असलेला संशयित आरोपी उमेश सावंत सांगली जिल्हा न्यायालयात आज हजर झाला. गेल्या वर्षभरापासून उमेश सावंत फरार होता. उमेश सावंतची वैद्यकीय तपासणी करुन जिल्हा कारागृहात रवानगी केली जाणार आहे.
मुख्य सूत्रधार उमेश सावंत असल्याची धक्कादायक माहिती
विजय ताड दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले असताना सांगोला रोडवर अल्फान्सो स्कूलजवळ हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला चढवला होता. यावेळी पळून जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच डोक्यामध्ये दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सांगली पोलिसांकडून चार पथके नियुक्त करण्यात आली होती. या प्रकरणी पाच जणांची नावे निष्पन्न झाली होती. यामध्ये मुख्य सूत्रधार हा भाजपचाच माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दादा मदने, आकाश व्हनखंडे आणि किरण विठ्ठल चव्हाण या संशयिताना तेव्हाच अटक करण्यात आली होती. मात्र, उमेश सावंत फरार झाला होता.
माजी नगरसेवक विजय ताड यांचे बंधू विक्रम ताड यांनी जत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीमध्ये संदीप उर्फ बबलू चव्हाणने त्याच्या साथीदारासोबत आपल्या भावावर गोळ्या झाडून व दगड घालून खून केल्याची तक्रार दिली होती. फिर्यादीमध्ये उमेश सावंतचाही उल्लेख करण्यात आला होता. विजय ताड नगरसेवक असताना उमेश सावंतने विजय ताडे यांचे नगरसेवक पद रद्द करावे, याबाबतचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल केला होता, असे या फिर्यादित म्हटले होते. त्यामुळे विजय ताड आणि उमेश सावंत यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असल्याचे समोर आले होते. मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, हे स्पष्ट होऊ शकलेलं नव्हतं. आता अटकेनंतरच या हत्येच्या कारणाचा उलघडा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या