(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar : मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलीचे टीईटी प्रमाणपत्र गेल्या अडीच वर्षांपासून सांगली झेडपीमध्ये पडून!
टीईटी घोटाळा प्रकरणातील 3 प्रमाणपत्रे सांगली जिल्हा परिषदेकडे होती. त्यातील 2 प्रमाणपत्रे हे संबंधित घेऊन गेले आहेत. मात्र, यातील तिसरे प्रमाणपत्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे असल्याचे दिसते.
राज्यभर गाजत असणार्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळा प्रकरणातील 3 प्रमाणपत्रे सांगली जिल्हा परिषदेकडे होती. त्यातील 2 प्रमाणपत्रे हे संबंधित व्यक्ती घेऊन गेले आहेत. मात्र, यातील तिसरे प्रमाणपत्र हे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचे असल्याचे दिसून येत आहे, जे नेण्यास कुणीही आलेलं नाही.
19 जानेवरी 2020 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे हे प्रमाणपत्र आहे. मात्र, हे प्रमाणपत्र सांगलीत कसे आले? याचा शोध मात्र अद्यापही लागलेला नसून पोलिस याबाबतीत अधिक तपास करत असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले. हे प्रमाणपत्र खरं की खोटं? हे अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबतचा गोपनीय अहवाल शासनास पाठवण्यता आला आहे. ही बाब गोपनीय असल्याचे सांगत ठोस माहिती देण्यास कोणीही तयार नाही.
सांगली जिल्ह्यात 2019 साली टीईटीची परीक्षा घेण्यात आली होती. याच परीक्षेत घोटाळा होत जिल्ह्यात 609 जण उत्तीर्ण झाले होते. यातील काही जणांची गैरप्रकारे प्रमाणपत्र मिळवल्याची शंका होती. त्यामुळे शासनाकडून आलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासणीसाठी तालुकानिहाय कॅम्प लावण्यात आले होते.
या कॅम्पमधून घेण्यात आलेले 197 जणांचे प्रमाणत्र शासनाकडे सादर करण्यात आले आहे. याची राज्यस्तरावर पडताळणी सुरू आहे. तसेच या गैरप्रकाराचा तपास आता ‘ईडी’ करीत आहे. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लागणार आहे.
8 जणांचे वेतन थांबविण्याचे आदेश
टीईटीच्या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर शासनाने 7 हजार 874 उमदेवारांना अपात्र ठरविले होते. मात्र त्यातील सुमारे 576 उमेदवार आजही विविध शाळांत कार्यरत असल्याचे माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने त्यांचे शालार्थ आयडी गोठविले आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील प्राथमिकचे 6 आणि माध्यमिकचे 2 असे एकूण 8 जणांचे वेतन थांबविण्याचे आदेश जिल्हा परिषदेला आले आहेत.
परीक्षेतील गुणांमध्ये वाढ करून फेरबदल केलेल्याची संख्या 120 आहे. तसेच अपात्र असताना बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतलेले 3 उमेदवार जिल्ह्यात परीक्षेला बसलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात 123 शिक्षकांचा या घोटाळ्यात समोवश आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फटारे यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.
जिल्हा परिषदेकडे रजिस्टरने आलेल्या तीन प्रमाणपत्रापैकी एकाचा वापर झाला आहे. तसेच दोन प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडेच असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यातील एक प्रमाणपत्र एका बहुचर्चित मंत्र्याच्या मुलीचे असल्याची चर्चा होती. आता हे पत्र मंत्री सत्तार यांच्या मुलीचे असल्याचे समोर आलं आहे. 19 जानेवरी 2020 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे हे प्रमाणपत्र आहे. मात्र, हे प्रमाणपत्र सांगलीत कसे आले याबाबतची माहिती अद्याप लागू शकली नाही.