Sangli Water Crisis : सांगलीतील पाणीटंचाई वाढली, कुपवाड एमआयडीसीचा पाणीपुरवठा देखील बंद
Sangli News : कृष्णा नदीतील पाणी पातळी खालावल्याने आता सांगली शहराला पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू लागली आहे. त्यातच आता कुपवाड एमआयडीसीलाहोणारा पाणीपुरवठा देखील आजपासून बंद झाला आहे.
Sangli News : एकीकडे कृष्णा नदीतील (Krishna River) पाणी पातळी खालावल्याने आता सांगली (Sangli) शहराला पाणीटंचाईची तीव्रता अधिक भासू लागली आहे. त्यातच आता कुपवाड एमआयडीसीला (Kupwad MIDC) होणारा पाणीपुरवठा देखील आजपासून बंद झाला आहे. कृष्णा नदीतील जॅकवेल पूर्णता उघडे पडल्याने एमआयडीसीला होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये असणारे मोठमोठे उद्योग कसे चालवायचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
उपसा बंदीचा परिणाम दिसू लागला पण...
दुसरीकडे कृष्णा नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर चार दिवस उपसा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. नदीच्या पाणी पातळीत थोडीशी वाढ होऊन पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने ही उपसा बंदी करण्यात आली. उपसा बंदी मागील दोन दिवसापासून केल्यामुळे उपसा बंदीचा परिणाम हळूहळू जाणवत असून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. मात्र आतापर्यंत तरी सांगली जवळच्या कृष्णाच्या पात्रामध्ये कृष्णा नदीची पाणी पोहोचले नाही. त्यामुळे जॅकवेलमधून पाणी उपसा करणं सध्या तरी शक्य नाही.
15 ते 20 दिवस पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता
उपसा बंदीचा परिणाम दिसायला आणि सांगली, कुपवाड एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरळीत व्हायला आणखी एक दोन दिवस लागतील. दुसरीकडे पाऊस देखील आणखी पंधरा ते वीस दिवस लांबेल अशी शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 15 ते 20 दिवस पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत.
पाणी पुरवण्यासाठील अंमलबजावणी करण्याच्या सूचना
दरम्यान लांबलेला मान्सून आणि सुरु झालेले पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा अधिकाऱ्यांची आणि ताकारी, म्हैसाळ सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत पालकमंत्र्यांनी पाऊस 15 ते 20 दिवस लांबेल अशी शक्यता धरुन नदीतील पाणी पातळी आणि गावागांवातील पाणी परिस्थिती पाहून पुढचे 15 -20 दिवस पाणी पुरेल अशी अंमलबजावणी करायच्या सूचना केली आहे.
पिके आणि भाजीपाला सुकून जाण्याची शेतकऱ्यांना भीती
मान्सूनने अद्याप तरी सांगली जिल्ह्यात हजेरी लावली नाही. त्यामुळे या आठवड्याभरात मान्सून दाखल होण्याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत. आठवड्याभरात पाऊस सुरु झाला नाही तर मात्र आणखी पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. तसेच ऊस सोडून अन्य पिके आणि भाजीपाला सुकून जाण्याची शेतकऱ्यांना भीती वाटत आहे.
हेही वाचा