Sangli Crime : शेअर मार्केट फसवणुकीतून सव्वा कोटींचा गंडा घालणाऱ्या आटपाडीतील व्हीएचएस कंपनीचा संचालक संतोष ढेमरेला अटक
आटपाडीत व्ही. एच. एस. ट्रेडर्स आणि एल. एल. पी. या कंपनीच्या भागीदारांनी संगनमत करुन अनेक लोकांना कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) आटपाडी तालुक्यात शेअर मार्केट फसवणूक प्रकरणात व्ही. एच. एस. ट्रेडर्स आणि एल. एल. पी. या कंपनीचा संचालक संतोष धोंडीराम ढेमरेला सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यात (Pune) अटक केली. आटपाडीत व्ही. एच. एस. ट्रेडर्स आणि एल. एल. पी. या कंपनीच्या भागीदारांनी संगनमत करुन आटपाडी परिसरातील अनेक लोकांना कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. ठेवीदार लोकांकडून बँक आणि रोखीने ठेव रक्कम स्वीकारली.
गुन्ह्यातील रक्कम आणि व्याप्ती मोठी
या गुंतवणूकदारांना कंपनीने चेक, ठेव पावत्या दिल्या आहेत. परंतु, कंपनीने ठेवीदारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांना कोणताही ठेव परतावा न देता 1 कोटी 27 लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत 28 फेब्रुवारी रोजी संतोष धोंडीराम ढेमरे, संदीप धोंडीराम ढेमरे, दादासो आणि कदम इस्माईल तांबोळी (सर्व संतोष ढेमरे रा. आटपाडी) यांच्याविरुध्द आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील रक्कम आणि व्याप्ती मोठी असल्याने गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत.
गुन्हा झाल्यानंतर होता फरार
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष धोंडीराम ढेमरे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने शोध सुरू होता. तो पुणे शहरात बिबवेवाडी येथे असल्याची खबर आर्थिक गुन्हे पोलीस शाखेच्या पथकास मिळाली. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस हवालदार अमोल विनोद लोहार, इरफान पखाली, उदय घाडगे, पोलिस नाईक विनोद कदम, दीपक हारुण रणखांबे, कुलदीप कांबळे, दीपाली पाटील यांनी आरोपीस अटक केली.
सांगली न्यायालयामध्ये आरोपीला हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान, व्ही. एच. एस. ट्रेडर्स आणि एल. एल. पी. या कंपनीच्या भागीदारांनी शेअर मार्केटमधून अधिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी सर्व कागदपत्र घेवून आर्थिक गुन्हे शाखा सांगली, अधीक्षक कार्यालय, विश्रामबाग, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन सुधीर पाटील यांनी केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :