Sangli News : जयंत पाटलांच्या कट्टर विरोधकांचे अण्णा डांगेंकडून कौतुक, सम्राट महाडिकांचा केला भावी आमदार म्हणून उल्लेख; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
Sangli News : गेल्या काही दिवसांपासून अण्णा डांगे यांची अजित पवार गटाशी जवळीक वाढली आहे. यामुळे जयंत पाटील यांना अण्णा डांगे यांच्याकडून शह देण्याचा प्रयत्न होत आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शिराळा (जि. सांगली) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कट्टर विरोधकांचे माजी मंत्री अण्णा डांगे यांच्याकडून जाहीर कौतुक झाल्याने सांगलीच्या राजकारणात भूवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अण्णा डांगे यांची अजित पवार गटाशी जवळीक वाढली आहे. यामुळे जयंत पाटील यांना अण्णा डांगे यांच्याकडून शह देण्याचा प्रयत्न होत आहे का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिराळामध्ये एका कार्यक्रमात अण्णा डांगे यांनी जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक गट असलेल्या महाडिक गटातील सम्राट महाडिक यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला.
महाडिक आमदार होणार म्हणजे होणारच
यावेळी बोलताना डांगे यांनी भावी आमदार सम्राट महाडिक आमदार होणार म्हणजे होणारच, अशी ओळख करून देताना शिट्ट्या व टाळ्यांनी सभागृह दणाणले. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या कार्यक्रमाला वाळवा-शिराळ्यातील माजी मंत्री, माजी आमदारांची उपस्थिती होती. यामध्ये माजी मंत्री व जेष्ठ नेते डांगे यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार होणार म्हणजे होणारच म्हटल्याने टाळ्या व शिट्यांचा कडकडाट
कार्यक्रमा दरम्यान अनेक मान्यवरांची भाषणे झाली. पुरस्कार सोहळ्याचे वितरण झाले. शेवटी डांगे अध्यक्षीय भाषण करण्यास उठले. भाषणाच्या सुरूवातीला मान्यवरांची ओळख करून देतानाच सम्राट महाडिक यांचे नावे घेताना शिराळ्याचे भावी आमदार असा केला. ते आमदार होणार म्हणजे होणारच असे म्हटल्याने टाळ्या व शिट्यांचा कडकडाट झाला. असे म्हणताच सम्राट महाडीक यांनी आण्णांना नमस्कार करत आभार व्यक्त केले.
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची कोल्हापूर येथे सभा झाली होती. या सभेलाही आण्णासाहेब डांगे यांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. रविवारी झालेल्या कार्यक्रमात सम्राट महाडिक यांच्यावरील या वक्तव्याने पुन्हा दोन्ही तालुक्यात चर्चा रंगली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनी 50 हजार मतांचा आकडा गाठला होता. आता ते पुन्हा नव्या जोमाने 2024 च्या शिराळा विधानसभा मतदारसंघात कामाला लागले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या