Sangli News : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या भर सभेत 'ज्ञानदान' करणाऱ्या मास्तरांचा गोंधळ, हुर्रेबाजी; थेट स्टेजवर अंडी फेकून मारली!
ज्या शिक्षक सभासदांनी अंडी फेकून सभेत गोंधळ घातला त्या शिक्षकांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याचा ठराव सभेत मांडण्यात आला. तो ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले.
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा (Sangli District Primary Teachers Cooperative Bank) नेहमीप्रमाणे मास्तरांच्या हुर्रेबाजी आणि गोंधळात पार पडली. विरोधी गटाने आक्रमक होत सत्ताधाऱ्याच्या दिशेने अंडी फेकण्यात आल्याने काही काळ सभेत गोंधळ निर्माण झाला. विरोधी गटाने सभा सुरू असताना स्टेजवरील अध्यक्ष आणि अन्य सत्ताधाऱ्यांच्या दिशेने अंडी फेकत सत्ताधाऱ्याच्या कारभाराचा निषेध केला.
अंडी फेकणाऱ्या शिक्षक सभासदांचे सभासदत्व रद्द
ज्या शिक्षक सभासदांनी अंडी फेकून सभेत गोंधळ घातला त्या शिक्षकांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याचा ठराव सभेत मांडण्यात आला आणि तो ठराव आवाजी मतदानाने मंजूर झाल्याचे बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सांगितले. माधवनगर रोडवरील डेक्कन हॉलमध्ये प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभा सुरू होताच विरोधी गट सत्ताधाऱ्यांच्या काही निर्णयाविरोधात घोषणाबाजी बाजी देत आक्रमक झाला. यानंतर बँकेचे अध्यक्ष सभेत वार्षिक अहवालाचे वाचन करत असताना समोरून स्टेजच्या दिशेने अंडी फेकण्यात आली.
सत्ताधारी गटाकडूनही जोरदार घोषणाबाजी
सभा सुरू झाल्यावर विरोधी गटाच्या सभासदांनी बँकेच्या गैरकारभाराविरोधात आणि बांधण्यात येणारी इमारत त्याचबरोबर ठरलेला लाभांश न दिल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. प्रचंड गदारोळात सुरू झालेल्या या सभेदरम्यान विरोधी गटाकडून स्टेजवर बसलेले अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या दिशेने दोन अंडी फेकण्याचा प्रकार घडला. स्टेज समोरच अंडी पडली. यानंतर सत्ताधारी गटाकडूनही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
गदारोळामध्येच सभा आटोपती घेतली
बँकेचे अध्यक्ष यांनी गदारोळामध्येच सभा आटोपती घेतली. विरोधी गटाने सभागृहाच्या बाहेर जाऊन सत्ताधारी गटाच्या विरोधात जोरदार निदर्शने करत निषेध नोंदवला. त्यामुळे दरवर्षी शिक्षक बँकेच्या सभेत असणारी गदारोळाची परंपरा यंदाही कायम असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या