Sangli News : सांगलीत तीन घोडींसोबत क्रूरकृत्य, गुप्तांग चक्क तांब्याच्या तारेने शिवले, अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल
Sangli News : सांगलीत अज्ञात व्यक्तीने तीन घोडींच्या योनी (अवघड जागा) तांब्याच्या तारेने शिवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी 2020 मध्ये या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगली : सांगलीत अज्ञात व्यक्तीने तीन घोडींच्या योनी (अवघड जागा) तांब्याच्या तारेने शिवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली (Sangli) शहर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी 2020 मध्ये या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तीन घोडींच्या (Female Horse or Filly) अवघड जागा तांब्याच्या तारेने (Copper Wire) अनैसर्गिक पद्धतीने शिवल्याचे आढळून आले आहे. या तीन घोडींचं वय अंदाजे दोन ते तीन वर्षे असल्याचं समजतं.
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
संबंधित तीन घोड्या सांगलीतील भारती हॉस्पिटलसमोर इथे बेवारस रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. घोडींची झालेली ही अवस्था खूप दुर्दैवी, वेदनादायक आणि बेकायदेशीर असल्याचे लक्षात आले. ॲनिमल राहतचे प्राणी कल्याण निरीक्षक कौस्तुभ किशोर पोळ यांनी त्वरित पोलीस ठाण्यात संबंधित घटनेची माहिती फोन करुन दिली आणि पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन फिर्याद दिली. ॲनिमल राहतच्या पशुवैद्यकीय डॉ. राकेश चित्तोरा, डॉ. विनायक सूर्यवंशी, डॉ. अजय बाबर, श्री. गोरखनाथ कुराडे यांच्यामार्फत घोडींना भूल देऊन संबंधित तांब्याच्या तारा काढून घेतल्या. डॉक्टरांनी तांब्याच्या तारा काढताना वेदनाशामक इंजेक्शनही दिले आणि त्यांना त्रासातून मुक्त केले. तिन्ही घोडींना रस्त्यावर जखमी अवस्थेत सोडले असते तर रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होईल, यामुळे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
तांब्याच्या तारेने शिवण्याचं कारण काय?
सांगली शहरामध्ये रस्त्यावर सर्वत्र घोडे फिरताना दिसतात. त्यांचा शर्यतीमध्ये (Racing) पळवण्यासाठी वापर होतो. शर्यत झाली की त्यांना रस्त्यावर चरण्यासाठी असे बेवारस सोडले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने मादी जास्त असतात. रस्त्यावर असे सोडल्यामुळे त्यांना इतर नर घोड्यांकडून गर्भधारणा होते आणि त्या शर्यतीमध्ये काही महिने पळू शकत नाहीत. म्हणून त्याना त्यांच्या मालकांकडून अशा अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्या योनीला (अवघड जागेला) वेगवेळ्या पद्धतीने शिवले जाते, जेणेकरुन नर घोड्याकडून गर्भधारणा होऊ नये. परंतु असे कृत्य करणे हे लाजिरवाणे आणि माणुसकीला काळिमा फासणारे असून या घटना थांबण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्वतः गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा प्राणीमित्राकडून होत आहे.
हेही वाचा