Sangli News: इस्लामपूर काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्काचा वाद शरद पवारांच्या कोर्टात!
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची दिल्लीमध्ये भेट घेत भूमिका मांडली. त्यामुळे कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असणारा वाद आता शरद पवारांच्या कोर्टात पोहोचला आहे.
Sangli News: सांगली जिल्ह्यातील (Sangli News) इस्लामपूर शहरातील तहसीलदार कचेरी शेजारी मोक्याच्या ठिकाणी असणारे पक्ष कार्यालय आमचे आहे. ते ताब्यात मिळावे यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) दिल्लीमध्ये भेट घेत भूमिका मांडली. त्यामुळे कार्यालयाच्या मालकी हक्कावरून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये असणारा वाद आता शरद पवारांच्या कोर्टात पोहोचला आहे.
वाळवा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, युवक प्रदेश काँग्रेस सचिव विजय पवार, काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष (अल्पसंख्याक) शाकीर तांबोळी यांनी भेट घेत या प्रश्नावर स्वतः लक्ष घालावे अशी मागणी केली. उद्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत चर्चा करू. इस्लामपूरच्या कार्यालयाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिली.
शरद पवार व नाना पटोले काय भूमिका घेणार याबाबत तालुक्यात उत्सुकता
ते म्हणाले की, आमच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे पक्ष कार्यालय आमच्याच मालकीचे आहे. 1999 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून काँग्रेस कमिटी कार्यालय राष्ट्रवादीचे पदाधिकारी वापरत आहेत. काही महिन्यांपूर्वी इस्लामपुरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात राष्ट्रवादी कार्यालयाची जागा ही काँग्रेसची असल्याबाबात चर्चा झाली होती. चर्चेच्या फेऱ्या झाल्यावर आणि आता शरद पवार व नाना पटोले काय भूमिका घेणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे.
आंदोलन, धरणे, इशाऱ्यांतर शरद पवारांनी दिली वेळ
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या हक्कावरून काँग्रेसकडून पत्रकार परिषदेत सर्व पुरावे सादर केले होते. एक दिवशीय धरणे आंदोलन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने नैतिकतेच्या आधारावर कार्यालय सोडले नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायचे की नाही याचा विचार करावा लागेल. आमच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला काँग्रेस कार्यालयात घुसावे लागेल. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांना शिष्टमंडळासहित भेटण्यासाठी दिल्लीत वेळ दिली होती. त्यानुसार शिष्टमंडळ भेटले आणि आपली भूमिका मांडली.
राष्ट्रवादीकडे नैतिकता असेल तर त्यांनी काँग्रेस कमिटीच्या इमारतीची जागा तत्काळ सोडावी आणि वाळवा तालुका काँग्रेस कमिटीच्या ताब्यात द्यावी, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या