शालेय पोषण आहारात आधी मृत साप आता उंदराची विष्ठा आढळली, सांगलीत चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ
सांगलीत शालेय पोषण आहारात मृत सापानंतर उंदराची विष्ठा आढळली. तासगाव तालुक्यातील बलगवडे मधील घटना
Sangli News : सांगलीमध्ये चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ चाललाय का? असा संतप्त सवाल उपस्थित झालाय. कारण, सांगलीमध्ये पोषण आहारात आधी मृत साप आढळला होता. त्यानंतर आता उंदराची विष्ठा आढळली आहे. याप्रकारानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तासगाव तालुक्यातील बलगवडेमध्ये शालेय पोषण आहारात उंदराची विष्ठा आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
सांगलीतील तासगाव तालुक्यामधील बलगवडेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. सांगलीतील पलूसमध्ये यापूर्वी शालेय पोषण आहारामध्ये मृत साप आढळून आला होता. आता सांगली जिल्ह्यातीलच तासगाव तालुक्यातील बलगवडेमध्ये शालेय पोषण आहारात उंदराची विष्ठा सापडल्याने खळबळ उडालीय. बलगवडेमधील एका विद्यार्थ्याला शालेय पोषण आहार देण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शालेय पोषण आहाराची पिशवी घरी नेली. घरात नेऊन पिशवी उघडून बघितल्यानंतर हा प्रकार आढळून आला. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी शालेय पोषण आहारामध्ये काही ना काही सापडत आहे. आता सांगलीमध्ये मृत सापानंतर शालेय पोषण आहारामध्ये उंदराची विष्ठा सापडली. त्यामुळे शासनाचा शालेय पोषण आहारामार्फत अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. राज्यात सर्वत्रच शालेय पोषण आहारामध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडत असल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे.
पलूस येथे शासना मार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता बालक पोषण आहारात सापडला मृत साप
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत साप सापडल्याची घटना पलूस तालुक्यात घडली होती.यामुळे पलूस परिसरातील लाभार्थी पालक व अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्षे पुरवला जातो. यामध्ये या अगोदर हरभरा, तांदूळ, तूरडाळ, गहू, तिकट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या. परंतु गेल्या एप्रिल महिन्या पासून तयार म्हणजेच डाळ तिखट मीठ एकत्रित करून तसेच गव्हाचे पीठ साखर एकत्रित करून आहार नवीन ठेकेदार नवीन कंपनीस दिला. नुकताच एप्रिल व मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला. तो तत्परतेने संबधित लाभर्ती यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले. काही लाभार्थ्यांनी सादर आहार घरी घेवुन गेल्यावर येथील कृषिनगर अंगणवाडी क्रमांक 116 येथून येथील लाभार्थी माझी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्या साठी आहार घरी नेला व तो पॅकींग फोडला आसता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला. त्यांनी तत्काळ संबधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला. संबधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला व ही बाब निदर्शनास आणून दिली. पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांची संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आला. पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मीटिंग घेवून सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला.