Sangli News : पिसाळलेल्या कोल्ह्याचा आईवर हल्ला; लेकीने आईला वाचवण्यासाठी कोल्ह्याचा आवळला गळा!
सुरेखा आपल्या मुलीसह मॉर्निंग वॉकसाठी फिरत असताना अचानक एक पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केला. यावेळी आपल्या आईला वाचविण्यासाठी मुलगी कविताने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच आवळून धरला
Sangli News : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) कवठेमहांकाळ तालुक्यातील कोगनोळी येथील आटपाडकर वस्ती येथील महिलेवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये सुरेखा लिंगाप्पा चौरे ही महिला जखमी झाली. मात्र, यावेळी मुलगी कविताने अत्यंत धाडसाने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच आवळून धरला. त्यावेळी आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोट काढून घेतले व बाजूला पडलेले दगड व काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली. त्याचवेळी मुलीने कोल्ह्याचा आवळलेला गळा सोडून दिला. आईने उगारलेली काठी व लेकीचे रौद्र रूप पाहून कोल्हा पळून गेला. या भयानक हल्ल्यावेळी तिथे असलेल्या कविताने थेट पिसाळलेल्या कोल्ह्याचा गळाच आवळून धरून केलेले धाडस यामुळे त्या कविताच्या धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.
सुरेखा आपल्या मुलीसह पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी फिरत असताना अचानक एक पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केला. हाताचा चावा घेतला व बोट धरले. यावेळी आपल्या आईला वाचविण्यासाठी मुलगी कविताने दोन्ही हाताने कोल्ह्याचा गळाच आवळून धरला, त्यावेळी आईने कोल्ह्याच्या तोंडातील बोट काढून घेतले व बाजूला पडलेले दगड व काठी घेऊन कोल्ह्यावर उगारली. त्याचवेळी मुलीने कोल्ह्याचा आवळलेला गळा सोडून दिला. या हल्ल्यामुळे सुरेखा चौरे यांनी आरडाओरड केल्याने तेथील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेऊन सुरेखा चौरे यांना जखमी अवस्थेत तत्काळ उपचारासाठी सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविले. पिसाळलेल्या कोल्ह्याचा मानवी वस्तीत वावर आणि महिलेवर हल्ला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या