Sangli Crime: सांगलीत दोन मोरांची शिकार; टोळीचा नागरिकांकडून पाठलाग, अल्पवयीन मुलास पकडले
मोरांची शिकार झाल्याने नागरिकांनी प्राणीमित्रांसह पोलिसांनी वनविभागाशी संपर्क साधला. मात्र, कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. शेवटी प्राणीमित्र आणि पोलिसांनी मोराचे मृतदेह घेवून वनविभाग गाठला.
Sangli Crime: सांगलीमधील (Sangli News) जुना बुधगाव रस्त्यावरील समाजकल्याण कार्यालयानजिक असणाऱ्या संभाजी कॉलनी येथे दोन मोरांची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली. एक मोर आणि एक लांडोर यांची शिकार करून घेवून जाणाऱ्या टोळीचा परिसरातील नागरिकांनी पाठलाग केला. नागरिकांनी एका अल्पवयीन मुलास पकडून ठेवले. यानंतर घटनास्थळी शहर पोलीस, प्राणीमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाकडेही संपर्क साधण्यात आला. मात्र, तीन तास उलटल्यानंतरही वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. राष्ट्रीय पक्षीची शिकार झाल्यानंतरही वनविभागास कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याची टीका परिसरातील नागरीकांनी केली.
जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिका आवास योजना परिसरालगत संभाजी कॉलनी आहे. याठिकाणी शेतीचा परिसर असल्याने मोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आज (24 जून) सकाळी एक टोळके जाळ्या घेवून शेतात बसले होते. सकाळी त्यांनी एक मोर आणि एक लांडोरची शिकार केली. त्यानंतर ते पोत्यात भरून निघाले होते. दरम्यान, परिसरातील काही सजग नागरिकांना संशय आला. त्यानंतर टोळीतील महिलांसह मुलांनी पोत खाली टाकत पळ काढला.
प्राणीमित्र आणि पोलिसांनी मोराचे मृतदेह घेवून वनविभाग गाठला
टोळीने पळ काढताच नागरिकांनी पाठलाग सुरू केला. पाठलाग करून एका अल्पवयीन मुलास पकडण्यात आले. टोळीतील अन्य पसार होण्यात यशस्वी झाले. पोते उघडल्यानंतर मोरांची शिकार झाल्याचे निदर्शनास आले. मोरांची शिकार झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. प्राणीमित्रांसह पोलिसांनी वनविभागाशी संपर्क साधला. मात्र, कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. शेवटी प्राणीमित्र आणि पोलिसांनी मोराचे मृतदेह घेवून वनविभाग गाठला. सायंकाळपर्यंत कोणताही पंचनामा करण्यात आला नव्हता.
दुसरीकडे, वनविभागाकडून मनुष्यबळ तोकडे असल्याचे कारण पुढे करत पेट्रोलिंग होत नसल्यामुळे सांगली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या शिकारी होण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वन्यजीवांच्या संरक्षणार्थ वेगवेगळ्या वर्गवारीत संरक्षण दिले जाते. मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. तो शेड्युल एकमध्ये सरंक्षण देण्यात आले आहे. शिकार किंवा तस्करी करणाऱ्याला तीन ते सात वर्षांची शिक्षेची तरतूद आहे. तसेच एक लाखांपर्यंत दंडही होतो. कुठे वन्यप्राण्याची शिकार अथवा तस्करी होत असल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी.
इतर महत्वाच्या बातम्या