(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : विरोधकांनी उताऱ्यात लिंबू पुरले अन् सत्ताधाऱ्यांनी निवडून येताच गाडीखाली चिरडले! सांगली जिल्ह्यातील प्रकार
लिंबू, मिरच्या आणि बाहुल्या आणून टाकून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकारही प्रकर्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत समोर आला. मात्र, सर्वांवर कडी होईल, असा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्याती घडला.
Sangli News : राज्यातील 7 हजारांवर ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करण्यात आला. हे करत असताना विरोधक तसेच सत्ताधाऱ्यांच्या गटातील उमेदवारांच्या दारात, अंगणात, लिंबू, मिरच्या आणि बाहुल्या आणून टाकण्याचा केविलवाणा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकारही प्रकर्षाने समोर आला. मात्र, सर्वांवर कडी होईल, असा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील कवठेमंहाकाळ तालुक्यातील चुडेखिंडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घडला. या निवडणुकीमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. मतदानापूर्वी विरोधकांकडून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी लिंबू पुरण्याचा प्रकार चुडेखिंडीत झाला. मात्र, प्रत्यक्षात मतमोजणीनंतर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.
विद्यमान सरपंच बापूराव पाटील यांनी या प्रकारानंतर खुलासा केला आहे. ते म्हणाले की, विरोधकांकडून भीती निर्माण करण्यासाठी असा प्रकार करण्यात आला होता. आमच्या बुथसमोर लिंबू, नारळ आणि बरंच काही पुरल्या होत्या. या प्रकारानंतर ग्रामस्थ भयभीत झाले होते. मात्र, गावकऱ्यांनी लिंबूचं काही चालत नाही हे निकालातून दाखवून दिले. लिंबू नारळ पुरला, तरी काही होत नाही. या कृत्याचा निषेध म्हणून आम्ही रस्त्यावर लिंबू टाकले व गाडीखाली चिरडले. अंधश्रद्धेला बळी पडू नका, लिंबू चिरडून टाका. त्यामुळे उतार वगैरे काही नाही.
आटपाडीत 'आयसीयू'मध्ये रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून तंत्र मंत्र म्हटल्याचा प्रकार?
निवडणुकीमधील हा प्रकार ताजा असतानाच सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्र तंत्र म्हणत अवैधरीत्या जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकाराला विरोध करूनही त्यांच्याशी हुजत घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी संपतराव नामदेव धनवडे (वय 43 रा.आटपाडी) यांनी आटपाडी पोलिसात निवेदन देत तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर संबंधित लोकांचे पोलिसांनी जबाब घेतले आहे. आजारी असलेली महिला बरी व्हावी यासाठी त्या महिलेच्या ओळखीमधील काही लोकांनी फक्त प्रार्थना म्हटली असल्याचे पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धनवडे यांनी आपल्या तक्रारीत आटपाडी गावात बेकायदेशीर अंधश्रद्धा पसरवून धर्म परिवर्तन करण्याचे काम जाणून-बुजून सुरू असल्याचे म्हटले होते. 21 डिसेंबर रोजी वरद हॉस्पिटल आटपाडी येथील सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ प्राप्त झाले आहे. सदर व्हिडिओत वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागातील दाखल झालेल्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी तंत्र मंत्राच्या आधारे भोंदूगिरी करताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Sangli News )
इतर महत्वाच्या बातम्या