Sharad Pawar: राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेत्याकडून शरद पवारांच्या राजीनाम्याचे जाहीरपणे स्वागत; म्हणाले, "नव्या पिढीने प्रत्यक्ष मैदानात लढण्याचे काम केलं पाहिजे"
प्रकृती साथ देत नसताना, राजकारणाचा खेळखंडोबा होत असताना शरद पवारांना या वेदना आता सहन होत नाहीत. अशावेळी त्यांनाच अध्यक्ष व्हावे, असे म्हणणे कितपत योग्य आहे? अशी विचारणा अण्णासाहेब डांगे यांनी केली.
Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आणि अनेक नेत्यांनी शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असे साकडे घातलं आहे. मात्र, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केलं आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी पक्ष सोडलेला नाही हे ध्यानात घेतले पाहिजे असे सांगितले. ते म्हणाले की, आज पवारांची वयाची 82 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 ते 20 वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. त्यातूनही ते प्रयत्नांनी बरे झाले आणि तेव्हापासून न थांबता आज अखेर परिश्रम घेत पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांना आजारी पडल्यामुळे ब्रिच कँन्डी रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. त्यातून आता सुदैवाने बरे झाले आहेत आणि त्यांना पुन्हा तुम्हीच पक्षाचे अध्यक्ष व्हा म्हणून कशासाठी आग्रह करायचा? असा सवाल डांगे यांनी उपस्थित केला.
"प्रत्यक्ष मैदानात लढण्याचे काम नव्या पिढीने केले पाहिजे"
शरद पवारांनी त्यांच्या पसंतीने पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा पक्षातील अन्य कोणावरही सोपवावी व नवीन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पाच ते दहा पदाधिकाऱ्यांची टीम तयार करून शरद पवार यांचा अनुभव समजावून घेत पुढील कामाची दिशा काय असावी? कसे करावे? हे त्यांच्या विचारसरणीतून व अनुभवातून ऐकून घेवून प्रत्यक्ष मैदानात लढण्याचे काम नव्या पिढीने केले पाहिजे, असा सल्लाही अण्णांसाहेब डांगे यांनी राष्ट्रवादी पक्षाला दिला.
प्रकृती साथ देत नसताना आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा होत असताना शरद पवारांना या वेदना आता सहन होत नाहीत. अशावेळी त्यांनाच अध्यक्ष व्हावे, असे म्हणणे कितपत योग्य आहे? अशी विचारणा करत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. राजकारण करत असताना कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचे याचे भान ठेवून आपल्या कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे असे डांगे म्हणाले.
शरद पवारांनी स्वतः आपल्या निर्णयावर विचार करायला चिंतन करायला दोन तीन दिवसांचा अवधी घेतला आहे. त्या चिंतनातून पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदाचे घोंगडे स्वःताच्या गळ्यात अडकून घेण्यापेक्षा जे नवीन अध्यक्ष करायचे आहेत त्यांना आणि नवीन आठ ते दहा जणांच्या टीमला आपल्या कामाची दिशा समजावून सांगावी. शरद पवार आणि राष्ट्रवादीचे अन्य नेते माझ्या या म्हणण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील, अशी अशा वाटते अशा भावना डॉ. आण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केली.
इतर महत्वाच्या बातम्या :